⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Breaking : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये सुरु असलेला जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसतोय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. मात्र महायुतीमधील भाजप सोडून अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीय. यामुळे उमेदवार कधी जाहीर होतील याकडे लक्ष लागून होते. अशातच आज शिवसेनेकडून 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

image 7
Breaking : शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर 1

मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा सांगितला जात होता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. शिवसेनेकडून देखील या मतदारसंघावर दावा सांगितला जात होता.

अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा पेच सुटत नसल्याने शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केला नाहीय. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता लागली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली.

काय म्हणाला गोविंदा
“नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपाने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”, असं गोविंदा म्हणाला.

जळगावात “वोट कर-जळगाव कर” मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगांव येथे निवडणूक विभागाच्या SVEEP उपक्रमाअंतर्गत आर.जे.देवा व आर.जे.शिवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदान जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.

या जनजागृतीपर कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेऊन सेल्फी पॉईट ला सेल्फी घेऊन “वोट कर जळगांव कर” या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविली. यावेळी ‘रेडिओ जॅकी’ शिवानी यांनी “वोट कर – जळगांव कर”, “ चुनाव का पर्व देश का गर्व” ‘माझे मत- माझे भविष्य”, “मतदार राजा जागा हो -लोकशाहीचा धागा हो”, “नर असो वा नारी-मतदान ही सर्वांची जबाबदारी”, “आपल्या मताचे दान- आहे लोकशाहीची शान”, “नवे वारे नवी दिशा-मतदानच आहे उद्याची आशा” अशा विविध घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी उपस्थित ‘रेडिओ जॅकी’देवा यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले की, तुम्ही मतदार यादीत नाव नोंदवलं नसेल तर तात्काळ नाव नोंदवा, इतर मतदारांनाही नाव नोंदणीसाठी प्रेरित करा ,मतदानाप्रती नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान द्यावे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून देश हितासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शेवटी सर्व उपस्थितांना लोकशाहीच्या परंपरेचे जतन, निष्पक्षपाती , निर्भयपणे व कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । आज २८ रोजी डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सावदा येथे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची फाल्गुन कृष्ण तृतीया तिथीनुसार ३९४ वी जयंती साजरी करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाजन यांनी शिवचरीत्राची माहिती उपस्थीतांना दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. केतकीताई पाटीलांनी वरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार जयंती निमित्ताने आज गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील यांनी वरणगाव (ता.भुसावळ) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सर्वप्रथम डॉ केतकी ताई पाटील यांनी पती डॉ वैभव पाटील यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील, सुनील काळे (माजी नगराध्यक्ष) भरत चौधरी (ए पी आय),मिलिंद भैसे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,) ऋषीकेश महाजन (समाजसेवक)नाना चौधरी (प्रवासी संघटनेचे अध्यक्ष), ऍड.ए.जी. जंजाळे (कायदे आघाडी जिल्हा उपाध्यक्ष),राजेश चौधरी (शाखा उपाध्यक्ष) सुशील झोपे (शेतकी संघ संचालक),गोलू राणे (ओबीसी मोर्चा अध्यक्ष),अनिल वंजारी,रमेश पालवे,मयूर शेळके,विवेक चौधरी,लीलाधर चौधरी,दीपक चौधरी,तेजस जैन,फझल मोहम्मद,अजमल खान,मुस्लिम अन्सारी,साबीर कुरेशी,राजा अलीम,दादू पालवे,भूषण माळी, कृष्णा पाटील,अश्फाक काजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गाड्यांचे सायलेन्सर चोरी करणारी टोळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडीचे सायलेन्सर चोरी करणाऱ्या टोळीच्या अमळनेर शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. तिघांनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अमळनेर शहरात वेगवेगळ्या भागात जाऊन मारुती सुझुकी कंपनीचे ईको गाडीचे सायलेन्सर चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आदेश दिले होते. दरम्यान ही चोरी संशयित आरोपी मनीष उर्फ सनी महाजन आणि त्याचे साथीदार हे सायलेन्सर चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील कमलाकर बागुल प्रवीण मांडोळे गोरख बागुल राहुल बैसाणे अशोक पाटील यांनी बुधवार २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर येथे जाऊन संशयित आरोपी मनीष उर्फ सनी रविंद्र महाजन, शरद उर्फ टकल्या दिलीप पाटील आणि निखिल संतोष चौधरी तिघे रा. अमळनेर यांना अटक केली. त्यांचा अजून एक साथीदार प्रशांत रघुनाथ चौधरी रा. अमळनेर हा सध्या नाशिक जेलमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या तीनही संशयितांची चौकशी केली असता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. ही दुचाकी नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निवडणुकीपूर्वी ‘मनरेगा’ कामगारांना केंद्र सरकारची भेट ; दैनंदिन वेतनात मोठी वाढ

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीपूर्वी मनरेगा कामगारांना केंद्र सरकारने भेट दिली आहे. केंद्र सरकारने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’ (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या दैनंदिन वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर मनरेगा कामगारांच्या वेतनात 3 ते 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने आज (28 मार्च) एक अधिसूचनाही जारी केली. हा वाढीव वेतन दर 2024-25 या आर्थिक वर्षात लागू केला जाईल. मनरेगा कामगारांचे नवीन वेतन 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल.

मनरेगाची मजुरी कुठे आणि किती वाढली?
केंद्र सरकारने मनरेगाच्या वेतनात चालू आर्थिक वर्षात केलेल्या वाढीप्रमाणेच वाढ केली आहे. अधिसूचनेनुसार, 2023-24 च्या तुलनेत 2024-25 साठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मजुरीच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. जे देशातील सर्वात कमी आहे. तर गोव्यात मजुरीत सर्वाधिक वाढ झाली आहे. येथे मनरेगा कामगारांच्या मजुरी दरात 10.6 टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २९७ रुपये रोज मिळेल. केंद्र सरकारने मनरेगा कामगारांच्या वेतनात अशा वेळी वाढ केली आहे जेव्हा पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये निधी रोखण्याबाबत वाद सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर अधिसूचना आली
एका मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांचा हवाला देऊन असे म्हटले आहे की, ग्रामीण विकास मंत्रालयाने वेतन दर वाढवण्याची अधिसूचना जारी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. कारण लोकसभा निवडणुकीमुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. मनरेगा कामगारांचे वेतन दर बदलणे ही एक नियमित प्रक्रिया आहे.

संसदेत वेतनवाढीचे संकेत मिळाले
या वर्षी संसदेतही मनरेगा कामगारांच्या वेतनात वाढ होण्याचे संकेत दिसले. त्यानंतर एका अहवालात ग्रामीण विकास आणि पंचायती राज विषयक संसदीय स्थायी समितीने राज्यांमध्ये मनरेगाच्या मजुरीच्या दरातील तफावतीची माहिती दिली होती. तेव्हा समितीने सांगितले होते की, सध्या कामगारांना दिले जाणारे वेतन पुरेसे नाही. जर आपण सध्याच्या राहणीमानाचा खर्च पाहिला तर, यासाठी वेतन दर खूपच कमी आहे. संसदीय स्थायी समितीने किमान वेतन 375 रुपये प्रतिदिन करण्याची शिफारस केली होती.

असं पहिल्यादांच घडतेय; शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यांच्या नावाचाही समावेश

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ४० नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे. असं असलं तरी या यादीत एक महत्त्वाचं नाव नाही. त्याचीही चर्चा रंगली आहे.

या यादीत शिवसेनेच्या लोकसभेतील प्रमुख नेत्याचंच नाही. शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत का नाही? याची चर्चा आता रंगली आहे. मात्र राहुल शेवाळे यांच्या नावाची वेगळी घोषणा स्टार प्रचारक म्हणून केली जाऊ शकते.

खरे तर आजवर पंतप्रधान मोदींनी कधीही शिवसेनेचा प्रचार केलेला नाही. मात्र यावेळी ते पहिल्यांदाच हे काम करणार आहे. एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना झाल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अजित पवार देवेंद्र फडणवीस प्रचार करताना दिसतील.

शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत यांचाही समावेश
या यादीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या मीना कांबळी, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री दिपक केसरकर, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय राठोड, आमदार भारत गोगावले यांची नावे आहेत. त्याचबरोबर माजी मंत्री दिपक सावंत, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार मनिषा कायंदे, मुख्य समन्वयक नरेश म्हस्के, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, प्रवक्ते राहुल लोंढे, उपनेते कृपाल तुमाने, आमदार आशिष जैयस्वाल, पूर्व विदर्भातील शिवसेना संघटक किरण पांडव हे नेते शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करतील, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

जळगाव, भुसावळला थांबा असलेल्या ‘या’ विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढवला

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे गाड्यांना असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ओखा – मदुराई विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढवला आहे. या गाडीला जळगावसह भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

०९५२० ओखा मदुराई साप्ताहिक विशेष गाडी आता २९ एप्रिल २०२४ पर्यंत चालवण्यात येईल. परतीच्या प्रवासात ०९५१९ मदुराई ओखा गाडी ३ मेपर्यंत सेवा देईल. गाडीची वेळा थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

या स्थानकांवर आहेत थांबा :
ही गाडी द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, ह.साहिब नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, महबूबनगर डॉन, गूटी , रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मानापराई, दिंडीगुल, कोडाईकनाल रोड आणि कुडालनगर स्टेशन.

दरम्यान, यापूर्वी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक बडनेरा या – विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. मुदतवाढ केलेल्या गाड्यांमध्ये ०१०२५ दादर ते बलिया गाडीची मुदत २९ मार्चपर्यंत होती. ती आता ३० जून २०२४ पर्यंत धावेल. ०१०२६ बलिया ते दादर विशेष गाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ती आता ३ जुलैपर्यंत चालेल.

तसेच ०१०२७ दादर ते गोरखपूर विशेष गाडी ३१ मार्चऐवजी ३० जूनपर्यंत धावेल. ०१०२८ गोरखपूर ते दादर गाडी २ एप्रिलऐवजी आता २ जुलैपर्यंत चालवली जाईल. ०११३९ नागपूर ते बडनेरा द्वि साप्ताहिक गाडी ३० मार्चऐवजी आता ८ जून २०२४ पर्यंत धावेल. ०११४० मडगाव ते नागपूर द्वि साप्ताहिक गाडी ३१ मार्चऐवजी ९ जूनपर्यंत धावणार आहे.