⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : नियमित कर्ज फेडले असल्यास…

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ६ हजार कोटींचा निधी लागेल. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्ज खात्यांसाठी अंदाजे रु. ५७२२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
या योजनेचा लाभ २०१९ मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसालासुद्धा हा लाभ मिळेल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
२०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अ ल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास, २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास अथवा २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.
मात्र, २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक/ अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रु. ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. प्रोत्साहनपर लाभ योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे