जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा शिवारामध्ये शेतातील पत्री शेडमधून तब्बल २३ शेळ्या-बोकड लांबवणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कासोदा पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशापर्यंत धाव घेत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे. अजय राजू चौव्हाण (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) असं अटक केलेल्या चोरट्यांचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी कासोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, कासोदा शिवारातील त्यांच्या शेतातील पत्री शेडचे कुलूप/आसरा तोडून अज्ञात चोरट्यांनी १८ लहान-मोठ्या शेळ्या आणि ५ लहान-मोठे बोकड, असा एकूण २३ शेळ्या-बोकडांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सपोनि श्रीकांत पाटील यांनी विशेष तपास पथक तयार केले.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे थेट मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गावात धडक दिली. तिथे शोध घेऊन पोलिसांनी अजय राजू चौव्हाण आणि सोहन विश्राम ब्राम्हणे या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसी खाक्या दाखवून कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहे.
इतर साथीदारांचा शोध सुरू
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांची नावे देखील समोर आली आहेत. त्यांचा तसेच चोरीस गेलेला उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
यांनी केली कारवाई
सदर धडक व उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड (चाळीसगाव उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकांत पाटील, ग्रेडपोउनि किशोर पाटील, पोहेकॉ किरण गाडीलोहार व पोकॉ योगेश पाटील यांच्या पथकाने पार पाडली आहे.









