⁠ 
बुधवार, मे 1, 2024

jalgaon : कांदा निर्यातबंदीचा असाही फटका ; दरात 1200 रुपयांची घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२३ । केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली असून यामुळे कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. चाळीसगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. यावेळी कांद्याचे दर बाराशे रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

बाजार समितीत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली असून देशात कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र या निर्णयानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणी बाजार समितीत कांदा खरेदी-विक्री व्यवहार बंद होता. मात्र चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी सुरू होती.

गेल्या शुक्रवारी कांद्याला 36 रुपये भाव मिळाला होता. मात्र दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी चाळीसगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाल्यांनतर दरात तब्बल 1200 रुपयांनी घसरले. कांद्याला 2364 रुपये इतका भाव मिळाला. मागील चार पाच दिवसात कांद्याचे दर जवळपास २ हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पावसाची तूट आणि घसरलेले लागवड क्षेत्र यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे भाव घाऊक बाजारात साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. निर्णय जाहीर होताच देशातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ५० टक्के म्हणजे क्विंटलमागे थेट १ ते २ हजार रुपयांनी घसरल्याचं चित्र आहे.