⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

शासकीय कापूस खरेदीबाबत मोठी अपडेट; शेतकऱ्यांनो कापूस विक्री आधी हे वाचा

जळगाव लाईव्ह न्यूज : ३१ ऑक्टोबर २०२३ : ‘अलनिनो’ प्रभावामुळे यंदा पाऊस लांबला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. जुलैत चांगला पाऊस झाला तरी ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू क्षेत्रातील कापसासह इतर पिकांची वाढ खुंटली. सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ८८ टक्के पावसाची नोंद झाली. याचा परिणाम कापसावरही दिसून येत आहे. यंदा झालेल्या अत्यल्प पावसामुळे अद्यापही खरिपातील कोरडवाहूचा कापूस आला नाही. पावसाच्या ओढीने अद्याप कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला बोंडे फुटलेली नाही. जो आला आहे, तो बागायती क्षेत्रातील आहे.

सध्या बागायती क्षेत्रातील कापसाचे उत्पादन बाजारात आले आहे. शेतकऱ्यांची या कापसाला अधिक चांगल्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे कापूस बाजारात येत नसल्याचे चित्र आहे. कापसाला सात हजार दोनशे ते सात हजार तीनशेपर्यंत व्यापारी दर आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरून अद्याप कापसाला मागणी सुरू झाली नाही. दरही कमी आहेत. यामुळे स्थानिक कापसाला व्यापाऱ्यांकडून मागणी नाही. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून सात हजाराच्या आत दर दिला गेल्यास ‘सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रे सुरू करणार आहे. जिल्ह्यात अकरा केंद्रे प्रस्तावित आहेत.

मुळातच, कापसाला चांगला भाव मिळाल्यास अधिकचा कापूस बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे ‘सीसीआय’ने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर सरकारी कापूस खरेदी सुरू होते. यंदा दिवाळीनंतर सरकारी कापूस खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. बाजारात कापसाला सात हजारांपेक्षा दर कमी मिळत असल्यास सीसीआय’ कापूस खरेदी सुरू करेल. जिल्ह्यात रावेर, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, पहूर, शेंदूर्णी, जळगाव, आव्हाणे, चोपडा, बोदवड, भुसावळ याठिकाणी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

यंदा उत्पादन, गुणवत्ता व भावही चांगला

यंदा कापूस उत्पादन चांगले येईल अशी अपेक्षा आहे. कापसाचा दर्जा चांगल्या क्वालिटीचा आहे. जिरायती कापूसही चांगला येईल. कारण अद्याप बोंड अळीचा शिरकाव झालेला नाही. यामुळे कमी उत्पादन असले, तरी त्याचा दर्जा चांगला राहील. परिणामी भाव चांगला मिळेल, अशी अपेक्षा आहे. यंदा कापसाला सध्या असलेला सात ते साडेसात हजारांचा दरच मिळेल, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहे. कारण अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाला मागणी वाढलेली नाही. जर काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाला मागणी वाढून खंडीचा दर साठ हजारांपर्यंत गेला, तरच कापसाचे दर वाढतील, असे चित्र आहे.

वेचणीस सुरुवात होताच भाव गडगडतात!

कापसाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्चही येतो. तसेच शेतकरी घाम गाळून कपाशीचे पीक जगवितात. मात्र ज्या वेळेस कापूस वेचणीस सुरवात होते त्याच वेळेस कापसाला योग्य भाव मिळत नाही, असा अनेक वर्षांपासूनचा शेतकऱ्यांच्या अनुभव आहे. व्यापाऱ्यांकडून ओला कापूस असणे, कापूस काळा पडणे, तसेच कापूस गरम असणे अशी विविध कारणे देऊन कापसाची कवडीमोल खरेदी करण्यात येते. तसेच परिस्थितीमुळे शेतकरी बांधवदेखील व्यापारी जो भाव देतील त्याच भावात कापसाची विक्री करीत असतात.