जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातून बेपत्ता झालेल्या ३९ वर्षीय विवाहित महिलेचा शोध अखेर धक्कादायक वास्तवावर येऊन थांबला. कविता अरुण सुतार यांचे अपहरण करून पद्मालय परिसरातील निर्जन जंगलात नेण्यात आले आणि तेथे दगडाने डोके ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे (२९) याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून घडल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितापर्यंत पोहोचत या प्रकरणाचा उलगडा केला.

मृत कविता अरुण सुतार या ८ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास आपल्या मुलासाठी जेवणाचा डबा तयार करत होत्या. दरम्यान, त्यांचा मुलगा आंघोळ करून बाहेर आला असता त्याला घरात कविता या दिसून आल्या नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही सतत बंद येत होता. कुटुंबीयांनी शेजारी आणि नातेवाईकांकडे कसून शोध घेतला, परंतु त्या कुठेही लागल्या नाहीत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याची तक्रार दिल्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पद्मालयच्या जंगलात सापडला मृतदेह
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि मोबाईलच्या कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. यादरम्यान, १३ सप्टेंबर रोजी एरंडोल हद्दीतील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात कविता सुतार यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृतदेह सापडल्याने बेपत्ता महिलेच्या प्रकरणाला हत्येचे गंभीर वळण मिळाले.
आरोपीची कबुली व अटक
पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित नरेश उर्फ आबा अनिल सोनवणे याचा माग काढून त्याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने जुन्या प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून कविता सुतार यांचे अपहरण केले होते, अशी कबुली दिली. आरोपीने त्यांना पद्मालयच्या जंगलात नेऊन निर्जन स्थळी दगडाने डोके ठेचून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही धडक कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.








