⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

सावद्यातील पुरातन महादेव मंदिर सभागृह व निवासस्थानास निधी देणार : आ चंद्रकांत पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । येथील कोष्टी वाड्यातील नवसाला पावणारे मनोकामना फलित करणारे पुरातन महादेव मंदिर १२५ वर्ष परंपरा लाभलेले देवस्थान असून मोठ्या संख्येने शिवभक्त गण दर्शनास व नवसफेडण्या येत असतात. येथे सांस्कृतिक सभागृह व भक्तगणां साठी निवस्थान मिळावे या साठी दि ३१ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदिर शंकराचे देवालय ट्रस्ट याचे विश्वस्त व समाजबांधव यांचे माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यात आली. भाविक भक्तांची सोय व्हावी यासाठी आमदार निधी उपलब्ध करून मिळावा अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे करताच त्यांनी येत्या पंधरा दिवसात उपलब्ध करून मार्गी लावून देण्याचे आश्वासन उपस्थितांना आ चंद्रकांत पाटील यांनी दिले. यामुळे कोष्टी समाजासहित परिसरातील शिव भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा सह परिसरात सदर पुरातन शिवमंदिरात अशी या मंदिराची ओळख असून येथील शिवसांब शिवभक्तांना पावतो अशी श्रद्धा आहे. या मुळे दरवर्षी येणाऱ्या श्रावण महिन्यात तसेच सोमवारी दर्शनासाठी या ठिकाणी खूप गर्दी असते. दर्शनासाठी दुरदुरून शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात.मात्र परिसरात मंदिराची जागा उपलब्ध असून मंदिरास कोणतीही आर्थिक उत्पन्न नसल्याने येथे सांस्कृतिक सभागृह व भक्तनिवास स्थान नसल्याने मुक्कामाची मोठी गैरसोय होत असते. या साठी सदर बांधकाम आमदार निधीतून उपलब्ध करून देण्यात यावे अशी रास्त मागणी मंदिराचे विश्वस्त पंडित ( लाला कोष्टी ) सीताराम कोष्टी यांनी निवेदनद्वारे केली आहे. त्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते बद्री परदेशी , सुभाष टीकाराम कोष्टी , सुरेश सिताराम कोष्टी , कैलास लोव्हगळे ,बाळू बन्नापुरे ,सतीश नारळे ,रवींद्र दांडगे यांनी मुक्ताईनगर येथे नुकतीच त्यांची भेट घेतली. यावेळस आ.चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबत दिल खुलासा चर्चा करून येत्या पंधरा दिवसात आमदार निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले .