वारकऱ्यांनो लक्ष द्या! संत मुक्ताई आषाढी वारी पालखीचे ‘या’ तारखेला प्रस्थान? जाणून घ्या संपूर्ण मार्ग आणि मुक्काम

जून 17, 2026 4:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे राज्यातून अनेक मानाच्या पालख्या निघत असतात. मुक्ताईनगरातील आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे प्रस्थान २४ जून रोजी दुपारी १ वाजता कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून होणार आहे. वारकरी संप्रदायातील अत्यंत मानाच्या आणि ऐतिहासिक अशा संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३१८ वे वर्ष आहे.

sant muktkai palkhi

‘तापीतीर ते भीमातीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वारीत खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा धार्मिक व सांस्कृतिक प्रवास अनुभवायला मिळतो. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतून पालखी मार्गक्रमण करणार असून, यामध्ये सुमारे दोन हजार वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.

तापी तीरावरील कोथळी येथून सुरू होणारी ही पालखी तब्बल ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करत २२ जुलै रोजी पंढरपूर येथील संत मुक्ताई मठ, दत्त घाट येथे पोहोचणार आहे. पालखी प्रस्थानापूर्वी संत मुक्ताईंच्या रथाची आकर्षक आणि सुगंधी फुलांनी नयनरम्य सजावट केली जाते. या सुशोभित रथात माऊलींच्या चांदीच्या पादुका विराजमान केल्या जातात, जे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असते. २४ जून रोजी कोथळी येथून प्रस्थान केल्यानंतर अवघ्या ३ किमी अंतरावरील मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात पालखीचा पहिला मुक्काम असेल.

पालखीचा मार्ग आणि मुक्कामस्थळे

२८ दिवसांच्या या पायी प्रवासात पालखी दसरखेड ➔ मलकापूर ➔ मोताळा ➔ बुलढाणा ➔ जळगाव ➔ चिखली ➔ भरोसा फाटा ➔ देऊळगाव मही ➔ देऊळगाव राजा ➔ जालना (कन्हैया नगर) ➔ काजळा फाटा ➔ अंबड ➔ वडीगोद्री ➔ गेवराई ➔ पाडळशिंगी ➔ नामलगाव फाटा ➔ बीड माळीवेस ➔ बीड बालाजी मंदिर ➔ पाली ➔ पारगाव ➔ वाकवड ➔ भूम ➔ जवळा ➔ शेंद्री ➔ माढा ➔ आष्टी आणि अखेर पंढरपूर मध्ये मुक्कामासाठी थांबणार आहे

निवास आणि भोजनाची व्यवस्था

२८ दिवसांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रत्येक मुक्कामस्थळी निवास व भोजनाची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. तसेच सकाळचा नाश्ता, चहा व दुपारच्या भोजनाची सोयही पालखीच्या मार्गावरील गावांमध्ये केली जाते. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now