⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मुक्ताईनगरात आणखी एका शेतकऱ्याने संपवली जिवनयात्रा

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. या पंधरवाड्यात तालुक्यात घडलेली हि दुसरी घटना असुन मागील आठवडाभरापुर्वी सुकळी येथील नारायण पाटील या तरुण शेतकऱ्याने पुलावरुन उडी घेत आपली जिवनयात्रा संपवली होती. तालुक्यात घडलेल्या या दुर्देवी घटनांमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी सक्षमीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

परभत न्हावकर (वय ६५ रा. पिंप्री भोजना ता. मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात काहीतरी विषारी द्रव्य सेवन करुन मृत्युला कवटाळले. आज पहाटे त्यांचा मृतदेह शेतात आढळुन आला. परभत न्हावकर या़चेकडे अवघी दिड एकर शेती असून सुमारे दोन लाखाच्या आसपास कर्ज आहे. दरम्यान आणखी उसनवारी पैशांतुन शेती मशागत करुन काही दिवसांपूर्वी पेरणी केली, मात्र पुरेशा पावसाअभावी ते निराशेत होते. त्यांचा मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला असुन मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला संजय परभत न्हावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलीस पाटील योगेश धुंदलेसह ग्रामस्थांनी याकामी सहकार्य केले. पुढील तपास पो.नि.शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ.संतोष चौधरी करीत आहे.

दरम्यान जुन महिन्याच्या सरतेवेळी पावसाच्या आशेवर बहुतांश शेतकऱ्यानी पेरण्या आटोपल्या खऱ्या मात्र पाऊसच गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे.गॅस हंडीसह खाद्यपदार्थ व शेतीसाहीत्यांच्या किंमती महागल्या असुन अल्पभुधारक शेतकरी बांधवांना महागाईचे चटके सोसणे असह्य होत असुन शेती करण्यासाठी कर्ज व उसनवार पैशांची जमवाजमव करावी लागत आहे.अल्पभुधारक सीमांत शेतकऱ्यांना पायाभुत सुविधा देण्यासाठी सरकारकडुन विविध उपाययोजनांची नितांत गरज आहे.वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती,अपुर्ण पाऊस यामुळे अल्पभूधारक शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती खालावली असुन नव्याने उभारी शासनाकडुन देण्याची अपेक्षा होत आहे.