जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात उर्जासंकट गडद होत असताना केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची कमतरता आणि वाढलेले दर यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असतानाच आता पीएनजी (पाईपलाईन गॅस) कनेक्शन देण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात येणार आहे.

आधीच अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे गॅसच्या बुकींबाबत सरकारने काही बदल जारी केले आहेत. एकदा गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर दुसरा गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 25 दिवसांची वाट पाहावी लागत आहेत. यानंतर आणखी एक निर्णय घेण्यात आलाय

सरकारच्या नव्या आदेशानुसार, पीएनजी कनेक्शनसाठी केलेला अर्ज अवघ्या 24 तासांच्या आत मंजूर केला जाणार आहे. यामुळे नागरिकांना एलपीजी सिलिंडरवर कमी अवलंबून राहावे लागेल आणि गॅसची उपलब्धता अधिक सुलभ होईल.
यासोबतच, ज्या घरांमध्ये आधीच पीएनजी कनेक्शन आहे, त्या घरांना एलपीजी सिलिंडर दिला जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे गॅसचा योग्य वापर आणि वितरण सुनिश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्राने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. पाईपलाईनशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास सांगितले असून, रोड रिस्टोरेशन चार्ज माफ करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पीएनजी नेटवर्कचा विस्तार वेगाने होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, प्रत्येक राज्यात या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि 25 दिवसांच्या प्रतीक्षेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, सरकारसमोर काळाबाजार रोखण्याचे मोठे आव्हान उभे आहे. नव्या निर्णयामुळे परिस्थितीत काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










