भुसावळात दामिनी पथकाची शाळा-कॉलेज परिसरात धडक मोहीम; विद्यार्थिनींशी साधला संवाद

जून 15, 2026 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रमा’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने धडक मोहीम राबविली. शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

damini pathak bsl

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि बसस्थानक परिसराला भेट देण्यात आली. यावेळी दामिनी पथकाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

शाळा, महाविद्यालये अन् बस स्थानकावर कडक पहारा

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींना निर्भय व सुरक्षित वातावरण मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी दामिनी पथकाने आज भुसावळ शहरातील विविध नामांकित शाळा, महाविद्यालये, मुख्य बस स्थानक आणि रिक्षा थांबे परिसराला अचानक भेटी दिल्या. या आकस्मिक भेटींमुळे परिसरात टवाळकी करणाऱ्या रोड रोमिओंचे चांगलेच धाबे दणाणले.

पोलीस दीदींचा थेट विद्यार्थ्यांशी संवाद

या मोहिमेदरम्यान केवळ गस्त न घालता, पोलिसांनी थेट विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक काळे आणि त्यांच्या पथकाने शाळा-कॉलेजच्या परिसरात स्वतः उपस्थित राहून विद्यार्थी-विद्यार्थिनींशी चर्चा केली. प्रवासादरम्यान किंवा शाळा परिसरात छेडछाड, पाठलाग किंवा मानसिक त्रास देण्याच्या काही घटना घडतात का, याबद्दल थेट माहिती घेत विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरात शिक्षणाचे अत्यंत पोषक व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी भुसावळ पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे. कोणत्याही विद्यार्थिनीला त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने दामिनी पथक किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now