⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

अमृत महोत्सव लेखनमाला : मातृभूमीसाठी आपल्या रक्ताचे अर्घ्य देऊन खुदीराम यांनी रचले इंग्रजांचे सरण.

सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ६

इ.स. १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यावर देशात एक राजनैतिक लाट उसळली, ज्यामध्ये इंग्रजांसमोर प्रार्थना करण्याची, याचना करण्याची आणि भीक मागण्याची प्रथाच जणू सुरू झाली. ए. ओ. ह्यूम या इंग्रजाने खरेतर याच हेतूने काँग्रेसची स्थापना केली होती. दुसरीकडे लोकमान्य टिळकांसारख्या प्रखर राष्ट्रवादी नेत्याच्या मार्गदर्शनाखाली असे तरुण तयार होऊ लागले, ज्यांनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करून, ब्रिटीश साम्राज्यवादाच्या सुदृढ इमारतीचा पाया हादरवून सोडला.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच विदेशात शिक्षण करणाऱ्या सेनापती बापटांसारख्या कित्येक क्रांतिकारक तरुणांनी, भारतात येऊन बाँब हल्ल्यांनी इंग्रज प्रशासकांना संपविण्याची योजना बनवली. या सर्व तरुणांनी हिंस्रक बाँब बनवण्याच्या प्रक्रियेचे; फ्रांससारख्या देशात आपले शिक्षण पूर्ण करत असतांना धडे घेतले. क्रांतीकारक अरविंद घोष यांनी स्थापन केलेल्या अनुशीलन समितीमध्ये, कन्हाईलाल दत्तच्या नेतृत्वात या बाँब मार्गाची जबाबदारी सांभाळण्यात आली. बंगालमध्ये गव्हर्नरच्या गाडीवर बाँब फेकण्यात आला. एका रेल्वे स्टेशनला जाळण्यासाठी सुद्धा हाच प्रयोग करण्यात आला. बाँब-परीक्षणासाठी अशा प्रकारचे कित्येक यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्न केले गेले.

याच दिवसांत, एका अत्यंत कठोर आणि राक्षसी वृत्तीच्या, मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड या इंग्रज न्यायाधिशाची बंगालमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्याने अनेक देशभक्तांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांनी किंग्सफोर्डला संपविण्याचा निश्चय केला. या योजनेची बातमी मिळताच, येणाऱ्या जीवघेण्या संकटापासून वाचविण्यासाठी सरकारने किंग्सफोर्डची; बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.

क्रांतिकारकांनी एका मोठ्या पुस्तकात बाँब लपवून, त्याचे पार्सल बनवून किंग्सफोर्डकडे पाठवले. तिथेच त्याचे डोके भडकले. त्याने ते पार्सल घेतलेच नाही. जर त्याने पार्सल उघडले असते, तर बाँबस्फोट होऊन त्याच्या शरीराचे चिंध्यांमध्ये रुपांतर झाले असते. तरीही देशभक्त तरुणांनी हिंमत सोडली नाही. त्यांच्यामागे अरविंद घोष सारख्या अनुभवी नेत्यांचा आशीर्वाद होता. या वेळी बंगालमध्ये सक्रियपणे क्रांतिकारक पूर्ण देशात आपला प्रभाव टाकत होते.

अखेर अनुशीलन समितीने बराच विचार-विमर्श करून खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या दोन नवतरुणांवर किंग्सफोर्डच्या हत्येची जबाबदारी सोपवली. बाँब, पिस्तुलसह दोन्ही नवतरुण मुजफ्फरपूरमधील एका धर्मशाळेत येऊन थांबले. आठ-दहा दिवस त्यांनी पूर्ण चौकशी करून, किंग्सफोर्डच्या येण्या-जाण्याची वेळ, त्याच्या गाडीचा रंग आणि सकाळ-संध्याकाळ त्याच्या उठण्या-बसण्याच्या ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळवली. बाँब फेकण्याचे ठिकाण आणि वेळ शिवाय पद्धत या सर्व बाबी ठरल्या. यावेळी दोन्ही नवतरुण मोठ्या उत्साहात होते.

मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड रोज संध्याकाळी एका जवळच्या क्लबमध्ये खाण्या-पिण्यासाठी आणि मौज-मजा करण्यासाठी जायचा. खुदीराम आणि प्रफुल्ल चाकी या दोघांनी त्याच मुहूर्तावर किंग्सफोर्डला नरकात धाडण्याचा निश्चय केला. ३० एप्रिल १९०८ रोजी, संध्याकाळी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी; आपली शिकार येण्याची वाट पाहत क्लबजवळच्या झुडुपांमध्ये लपले. जशी ती निश्चित रंगाची गाडी तिथून बाहेर आली, खुदीरामने लगेच त्या गाडीवर बाँब फेकला. त्या गाडीचा अगदी भुगा झाला. दुर्भाग्य म्हणजे; ती गाडी किंग्सफोर्डची नसून दुसऱ्याच इंग्रज अधिकाऱ्याची होती. त्यात बसलेल्या एका स्त्री आणि तिच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. किंबहुना त्या गाडीचा रंग आणि किंग्सफोर्डच्या गाडीचा रंग सारखाच होता आणि तसंही; किंग्सफोर्डच्या संरक्षणासाठी शिपायांची फौज उभीच होती. क्रांतिकारकांच्या या बाँब-प्रयोगाच्या घटनेमुळे सगळीकडे गोंधळ उडाला.

हे निश्चित काम करून खुदीराम बोस घटनास्थळावरून पळण्यात यशस्वी झाला, मात्र १७ वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक; प्रफुल्ल चाकी रात्रभर धावत-पळत, जवळपास ३० मैल अंतरावरील एका बैनी नामक नगरात येऊन पोहोचला. उपाशी आणि तहानलेला हा नवतरुण; चहाच्या एका छोट्या टपरीसमोर आला आणि भूक शमविण्यासाठी त्याने थोडे चणे खाल्ले. इकडे खुदीराम आपला उद्देश यशस्वी झाल्याबद्दल अभिमान बाळगू लागला. आज त्याने आपल्या क्रांतीकारक संस्था; अनुशीलन समितीच्या आदेशाचे पालन करून, एका दैत्याला ठार केले होते. मात्र थोड्याच वेळात त्याचा हा आनंद आणि संतोष; दोन्हीही निराशेत बदलले.

चहाच्या टपरीवर चर्चा चालू होती, कि काल रात्री मुजफ्फरपूरमध्ये दोन इंग्रज आई आणि मुलीचा मृत्यू झाला. म्हणजेच ‘किंग्सफोर्ड वाचला’ या बातमीने खुदीराम विचलित झाला. तो इतका दु:खी झाला, कि टपरीसमोरच रागात ओरडला, “किंग्सफोर्ड कसा काय वाचू शकतो?” त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव पाहून टपरीवरील लोकांना शंका आली, कि काल रात्री बाँब फेकणारा हाच तर नाही! खुदीराम भानावर येताच तिथून पळू लागला. ते लोक खुदीरामला परडण्यासाठी त्याच्यामागे पळू लागले. देशासाठी आपला जीव देणाऱ्या या नवतरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतांना त्या लोकांना थोडीही लाज वाटली नाही.

खुदीरामजवळ खिशात एक भरलेली पिस्तुल होते. हवं तर तो त्या लोकांना आणि शिपायांना गोळ्याही घालू शकत होता, पण त्याने आपल्याच देशवासियांना मारणे; उचित समजले नाही. कारण त्याच्याजवळ असणाऱ्या गोळ्या, पिस्तुल आणि बाँब; भारतीयांवर अत्याचार करणाऱ्या इंग्रजी राक्षसांसाठी होत्या. थकून-भागून, उपाशी आणि तहानलेल्या अवस्थेत हा स्वातंत्र्यसैनिक शिपायांच्या तावडीत सापडला. न्यायालयाद्वारे खुदीरामला मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली. ११ ऑगस्ट १९०८ रोजी या नवतरुण स्वातंत्र्यसैनिकाला फाशी देण्यात आली. फासावर जाण्याआधी त्याने गीतेतील काही श्लोक उच्चारले आणि स्वत:च आपल्या हातांनी फाशीची दोरी आपल्या गळ्यात अडकवून हौतात्म्य पत्करले. 

सरकार ने ज्याला हत्यारा म्हणत मृत्युदंड दिला, त्यालाच जनतेने ‘हुतात्मा’ हा सम्मान देऊन त्याच्यावर अग्निसंस्कार केले. हजारो स्त्री-पुरुषांनी या हुतात्माच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन फुलांचा वर्षाव केला. उल्लेखनीय आहे; कि खुदीरामच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी कलकत्ताच्या कालिदास नामक एका वकीलाने केली होती. त्याच वकीलाने खुदीरामचे खटल्यादरम्यान समर्थनही केले होते; मात्र तो त्याला वाचवू शकला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खुदीरामचे मोठे स्मारक बनविण्यात आले. बहुतांश मोठ-मोठ्या नेत्यांनी या स्मारकासमोर श्रद्धांजली वाहिली, पण पंडीत जवाहरलाल नेहरू काही या ठिकाणी आले नाही. कारण त्यांची देशभक्ती तर हातात भिकेची वाटी घेऊन इंग्रजांकडे भीक मागण्यापर्यंतच मर्यादित होती.

सशस्त्र क्रांतीचे प्रबळ समर्थक; लोकमान्य टिळक यांनी आपल्या केसरी या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला, “अशा प्रकारच्या हत्या दुसऱ्या साधारण हत्यांसारख्या नाहीत. कारण या हत्या घडवून आणणाऱ्यांनी अत्यंत उच्चस्थ भावनांकडे आकर्षित होऊन ही कामे करण्याचे योजिले आहे. जोपर्यंत प्रत्येक इंग्रज अधिकाऱ्याला शोधून-शोधून घाबरवल्या-मारल्या जाणार नाही, तोपर्यंत ही निरंकुश विदेशी व्यवस्था बदलली जाऊ शकत नाही.” उल्लेखनीय आहे, कि या प्रकारचे इंग्रज-विरोधी निर्भिड लेख लिहिल्यामुळे, लोकमान्य टिळकंना ६ वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागली. याच वेळी त्यांनी आपला प्रसिद्ध ग्रंथ; ‘गीता-रहस्य’ची रचना केली.

तिकडे खुदीरामचा साथीदार; प्रफुल्ल चाकी धावत-पळत जवळच्या समस्तीपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला आणि कलकत्त्याला जाण्यासाठी रेल्वेच्या साधारण डब्यात बसला. त्याच डब्यात एक पोलीस अधिकारी नंदलाल बसलेला होता. त्याने प्रफुल्ल चाकीला ओळखले. तो स्टेशनवर उतरला आणि त्याने बाकी पोलिसांच्या मदतीने चाकीला पकडण्याचा प्रयत्न केला. चाकीने लगेच आपल्या खिशातून पिस्तुल काढले आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावर गोळ्या चालवल्या. चाकीला; आता अटक होऊन कारागृहाच्या तसेच न्यायालयाच्या बंधनात अडकण्याची इच्छा नव्हती.  त्याने आपलेच पिस्तुल आपल्या माथ्यावर ठेवून गोळी चालवली आणि स्वत:च मृत्युदेवतेच्या कुशीत निघून गेला. स्वत:ला बेड्यांमध्ये बंदिस्त होऊ न देता, स्वत:चेच जीवन संपविण्याची ही पहिली घटना होती. यानंतर क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांनी सुद्धा इलाहबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये कित्येक पोलिसांना गोळ्या घालून ठार मारल्यावर, आपल्याच पिस्तुलाने हौतात्म्य पत्करले होते.

खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्याद्वारे मुजफ्फरपूरमध्ये केल्या गेलेल्या बाँब हल्ल्याने इंग्रजांच्या सिंहासनाला हादरवून सोडले होते. विदेशी प्रशासकांना कळून चुकले होते, कि भारतात सशस्त्र क्रांतीची आग आता गतिमान होत आहे.

यादरम्यान क्रांतिकारकांनी आपले गुप्त ठिकाण; डॉ. घोष या सिव्हील सर्जनच्या बंगल्याच्या बागेत हलवले. सर्व क्रांतिकारी गतिविधींचे संचालन तिथूनच होऊ लागले. पोलिसांच्या रात्रंदिवस चौकशीमुळे बाँब बनवण्याचे ठिकाण शोधण्यात यश आले. या जागी काम करणाऱ्या ४० क्रांतीकारक देशभक्तांना पकडून कारागृहामध्ये डांबण्यात आले. यात अरविंद घोष, नलिनी, वीरेंद्र घोष आणि कन्हाईलाल दत्त यांसारख्या अतिसक्रिय क्रांतिकारकांचा समावेश होता. अलीपूर कारागृहात बंदिस्त असल्यामुळे या अभियोगाचे ‘अलीपूर षड्यंत्र’ असे नामकरण झाले.

या कथित षड्यंत्राचा अभियोग चालूच होता; तेवढ्यात क्रांतिकारकांचा एक सोबती; नरेंद्र गोस्वामी पोलिसांमार्फत साक्षीदार बनून बाकी साथीदारांचे रहस्य उलगडू लागला. नरेंद्र गोस्वामीला आता बाकी कैद्यांपासून वेगळ्या सुरक्षित स्थानीं ठेवण्यात आले. या फितुरामुळे क्रांतिकारकांचे सगळे प्रयत्न वाया जाण्याच्या भितीने, क्रांतिकारकांनी कारागृहातच नरेंद्र गोस्वामीचे शरीर जमीनदोस्त करण्याचे ठरविले.

आपल्याच साथीदाराकडून केला गेलेला हा विश्वासघात, क्रांतिकारक कन्हाईलाल दत्त याला सहन झाला नाही. स्वातंत्र्यसैनिकांसोबत होणाऱ्या या चुकीच्या व्यवहाराची आणि अपराधाची एकच शिक्षा होती; मृत्युदंड. ‘अलीपूर षड्यंत्र’शी संबंधित सर्व साथीदारांनी सर्वसमंतीने निर्णय घेत, हे शुभकार्य संपन्न करण्याची जबाबदारी कन्हाईलाल दत्त याला दिली. न्यायालयात ग्वाही देण्याआधीच नरेंद्र गोस्वामीला संपविणे; गरजेचे होते.

योजनेनुसार कन्हाईलाल आणि साथीदार सत्येंद्र यांनी कारागृहाच्या दोन पहारेकऱ्यांशी मैत्री करून, बाहेरून दोन पिस्तुल मागवून घेतले. हे दोन्ही पिस्तुल कैद्यांसाठी आणल्या जाणाऱ्या भाजीच्या पातेल्यात लपवून आणल्या गेले. या घटनेवरून हे लक्षात येते, कि कारागृहात बंदिस्त असलेल्या क्रांतिकारकांचे हात कुठवर पोहोचणारे होते. एका दिवशी आजारपणाचे कारण सांगून कन्हाईलाल और सत्येंद्र हे दोघेही कारागृहाच्या दवाखान्यात पोहोचले. त्यांनी कारागृहाच्या अधिकाऱ्यांजवळ संदेश पाठवला, कि, ‘आम्ही सुद्धा सरकारी साक्षीदार बनू इच्छितो.’ सोबतच त्यांनी नरेंद्र गोस्वामीसोबत मिळून क्रांतिकारकांच्या विरोधात संयुक्त वक्तव्य देण्याचेही सांगितले. कारागृहातील पोलीस व त्यांचे अधिकारी या दोघांच्या डावात फसले आणि या दोघांची नरेंद्र गोस्वामीला भेटण्याची व्यवस्था करून देण्यात आली.

तिघांनी संयुक्त वक्तव्य तयार करण्यासाठी कारागृहातील अधिकाऱ्यांच्या पाहणीत एकमेकांना भेटणे सुरू केले. एका दिवशी संधी पाहून सत्येंद्रने; फितूर नरेंद्रवर गोळ्या चालवल्या. नरेंद्रने पळ काढण्याचा प्रयत्न करताच, त्याला कन्हाईलालनेही गोळ्या घातल्या. या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शिपायाला देखील कन्हाईलालने जागीच शांत केले. धावत असतांना गोस्वामीला; सत्येंद्र आणि कन्हाईलाल यांच्या तीव्र हल्ल्यामुळे मृत्युला आलिंगन द्यावे लागले. त्याच्या शवाला लाथ मारून कन्हाईलाल आणि सत्येंद्र यांनी आपल्या क्रोधाची आग शांत केली. ते दोघेही प्रसन्न होते, कारण त्यांनी निरंकुश साम्राज्यवादाच्या एका दलालाला आणि भारताच्या शत्रूला कारागृहातच मृत्युदंड दिला होता.

याप्रकारे देशभक्तांच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे चालवत, कन्हाईलाल आणि सत्येंद्र हे दोघेही प्रसन्न भावनेने आणि साहसी वृत्तीने आपल्या फाशीची वाट पाहू लागले. आपल्या वीरतेवर हे दोन्ही क्रांतिकारक इतके प्रसन्न होते, कि नरेंद्र गोस्वामीची हत्या आणि त्यांच्या फाशीच्या तारखेदरम्यान, दोघांचेही वजन १० ते २० पाऊंड इतके वाढले होते. निरंकुश प्रशासकांद्वारे १० नोव्हेंबर १९०८ रोजी कन्हाईलाल दत्त याला फाशी देऊन त्याच्या जीवनलीलेला संपविण्यात आले.

कन्हाईलालची आई फाशीच्या आधी जेव्हा त्याला भेटण्यासाठी आली, तेव्हा तो वीरव्रत क्रांतिकारक म्हणाला, “आई! जर तू मला भेटण्याच्या वेळी डोळ्यांतून अश्रू गाळणार नसशील, तरच मी तुला भेटेन.” आणि असेच झाले. आईने कठीण प्रयत्नांनी आपले अश्रू रोखून, देशासाठी हौतात्म्य पत्करण्याकरिता जाणाऱ्या मुलाला मौन साधूनच आशीर्वाद दिला. तिकडे कन्हाईलालच्या मोठे बंधूंनी भेटीदरम्यान त्याला माहिती दिली, कि “तुझ्या बी.ए.च्या पदवीचा आजच निकाल लागला आहे आणि त्यात तू प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाला आहेस.” कन्हाईलालने वीरतापूर्वक उत्तर दिले, “माझ्या पदवीला सुद्धा फांसावर लटकवण्यात यावे; अगदी माझ्यासारखीच, ती सुद्धा देशभक्तीच्या पुरस्काराची (मृत्युदंडाची) मानकरी आहे.”

कन्हाईलालच्या अंत्ययात्रेत हजारो स्त्री-पुरुषांनी सहभाग नोंदवत, आपल्या लाडक्या हुतात्म्याला जड अंत:करणाने श्रद्धांजली दिली. ही अंत्ययात्रा बंगालसहीत संपूर्ण देशाच्या इतिहासात अविस्मरणीय पानांमध्ये अजरामर राहील. क्रांतिकारक हुतात्माचा एवढा सम्मान पाहून सरकार घाबरून गेले. म्हणून त्यांनी कन्हाईलालचा दुसरा साथीदार; सत्येंद्रच्या फाशीनंतर त्याचे शव गुपचूप कारागृहातच जाळून टाकले.

फितूर साथीदारांना आणि देशद्रोहींना मृत्युदंड देण्याला; देशभक्त क्रांतिकारकांनी आपले कर्तव्य मानून, खुदीराम बोस, कन्हाईलाल, सत्येन्द्र आणि प्रफुल्ल चाकी यांना फसवणाऱ्या, पकडून देणाऱ्या, तसेच यांच्याविरुद्ध ग्वाही देणाऱ्या सर्व फितुरांना क्रांतिकारकांनी न्यायालयाच्या प्रांगणामध्येच गोळ्या घातल्या. याप्रकारे सर्व क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या विरोधात, या सशस्त्र स्वातंत्र्यसंग्रामासाठी आपल्या रक्ताचे अर्घ्य देऊन हे कार्य पुढे चालू ठेवले. या हुतात्म्यांच्या अमरगाथेवाचून ब्रिटीश साम्राज्यवादाला मुळासहीत उपटून टाकण्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धाचा इतिहास पूर्णत: अर्धवट राहील.

क्रमश:

नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार

मराठी अनुवाद – अविनाश काठवटे