अधिकारी व उच्चपदस्थ साधणार संवाद
जळगाव लाईव्ह न्यूज । गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, लोकजागृती आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणारा उत्सव व्हावा, या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारातून प्रेरणा घेत नोबेल फाउंडेशनतर्फे सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पात ‘ज्ञानोत्सवा’ला उत्साहात प्रारंभ झाला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित या ज्ञानोत्सवात दररोज गणपतीच्या आरतीनंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर, उच्चपदस्थ अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

संत जनार्दन महाराज यांच्या प्रेरणेने जळगाव येथे सुरू असलेल्या सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शैक्षणिक आधार दिला जातो. या प्रकल्पातील विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी, जेईई आणि नीट यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहेत. या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच जीवनातील अनुभव, संघर्ष आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्य कर अधिकारी असलेले अधिकारी राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘काळ्या निळ्या रेषा’ या पुस्तकाचे लेखक व चित्रकार राजू बाविस्कर तसेच जळगाव एमआयडीसीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजश्री पाटील म्हणाल्या, “तुमचे ध्येय किती मोठे आहे, यावर तुमच्या मेहनतीचे प्रमाण ठरत असते. आपण कधी सुरुवात करतो याला महत्त्व नाही; मात्र त्या सुरुवातीला योग्य मेहनतीने न्याय दिला पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये कोणताही विषय कठीण नसतो. योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपण कोणत्याही विषयावर मात करू शकतो.”
पोलीस प्रशासनातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी मुलींनी मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाकडे करिअर म्हणून पाहावे, असे आवाहन केले. “पोलीस पदाच्या माध्यमातून अन्यायग्रस्त आणि त्रस्त लोकांना मदत करण्याची संधी मिळते. त्यामुळे मुलींनी अधिकाधिक संख्येने पोलीस प्रशासनात यावे,” असे त्यांनी सांगितले.
यानंतर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रकार राजू बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आपल्या संघर्षमय बालपणाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “माझे बालपण हीच माझ्या जगण्याची खरी शक्ती बनली. चोपडा तालुक्यातील लासूर गावात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत माझे बालपण गेले. गावातील मेलेल्या जनावरांची कातडी काढणे, गावात मरून पडलेली जनावरे गावाच्या वेशीबाहेर टाकणे आणि प्रत्येक अमावस्येला दारोदारी अमावस्या मागणे, अशा अत्यंत कठीण परिस्थितीचा मी अनुभव घेतला.”
“या संघर्षातून पुढे जात आज माझी चित्रे ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रदर्शित झाली आहेत. माझ्या आयुष्यात आलेल्या दुःखानेच मला घडवले,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना संघर्षाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला.
आपल्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी जिद्द आणि संघर्षाची तयारी आवश्यक असल्याचे सांगताना बाविस्कर म्हणाले, “आपल्याला आपल्या क्षेत्राशी अक्षरशः युद्ध पुकारता आले पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो.” भारतीय समाजातील महिलांच्या सामर्थ्याचा उल्लेख करत त्यांनी मुलींना जीवनाकडे आव्हान म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
“जीवनात आलेली चांगली माणसे आणि चांगली पुस्तके तुमचे जीवन घडवू शकतात. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चांगली माणसे भेटणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात भालचंद्र नेमाडे, वसंत डहाके, रंगनाथ पठारे, ना. धों. महानोर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासातून मी बदलत गेलो आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकलो,” असेही त्यांनी सांगितले.
या संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले. राजू बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत शिक्षण, संघर्ष, कला, साहित्य, जीवनातील अनुभव आणि यशाचा प्रवास याबाबत मार्गदर्शन केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेला हा ज्ञानोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, आगामी दिवसांत विविध क्षेत्रांतील मान्यवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. धार्मिक उत्सवाला ज्ञान, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरत आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर नोबेल फाउंडेशनच्या संचालिका जयश्री पाटील, ग्लोबल मिशन स्कूल बाहुटे, ता. पारोळा चे संचालक मनोहर पाटील, नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील, सतपंथ प्रकल्पाचे रमेश पाटील तसेच नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे राज्य समन्वयक विवेक साळुंखे उपस्थित होते.







