⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अल इम्रान फाउंडेशनतर्फे रेल्वे प्रवासातील रोजेदारांना दररोज २०० सहेरी किटचे मोफत वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील काझी प्लॉटमधील अल इम्रान फाउंडेशनतर्फे रमजानचे रोजे (उपवास) असलेल्या २०० रेल्वे प्रवाशांसाठी दररोज मोफत सेहरीची व्यवस्था केली जाते. त्यासाठी मध्यरात्री १२ वाजेपासून सहेरीसाठीचे अन्न शिजवून पहाटे ५च्या सुमारास वितरण केले जाते.

रमजान महिन्याचे उपवास असलेल्या मुस्लिम बांधवांना प्रवासात अनेकदा अडचणी येतात. सहेरीसाठी रात्री पौष्टिक अन्न मिळत नाही. मिळाले तरी ते बेचव असते. अशा वेळी घरगुती पद्धतीने बनवलेल्या पदार्थांची नितांत गरज असते. ही बाब ओळखून शहरातील अल इम्रान फाउंडेशनने आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या किमान २०० रोजेदार बांधवांना मोफत सहेरी देण्याचा निर्णय घेतला. ही सेहरी तयार करण्यासाठी रात्री १२ वाजेपासून सुरुवात होते. भाज्या, चपाती, भात, लस्सी, खजूर आणि पाण्याची बाटली असे २०० किट तयार केले जातात.
हे कीट पहाटे सहेरीच्या वेळी प्रवासात असलेल्या मुस्लिम रोजेदार बांधवांना मोफत वाटप केले जातात. या उपक्रमासाठी अल इम्रान फाउंडेशनचे सदस्य शरीफ पिंजारी, इरफान पठाण, वसीम खान, सलमान खान, अमीर शेख, मुबारक खाटीक, इम्रान खान, वसीम सय्यद, इम्रान शेख आदी परिश्रम घेत आहेत.

रेल्वे प्रवासात असलेल्या मुस्लिम रोजेदारांना सहेरीसाठी अनेकदा अडचणी येतात. सकाळी पुरेसे अन्न मिळाले नाही तर दिवसभर उपवास कठीण होतो. यामुळे ही सुविधा सुरु केली आहे. रेल्वे प्रवासात असलेल्या रोजेदार बांधवांनी आमच्याकडे संपर्क केल्यास त्यांना गाडीतील बर्थवर सहेरीचे किट आणून दिले जाईल. शरिफ पिंजारी, सदस्य, अल इम्रान फाउंडेशन