जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। अतिक्रमण निर्मूलनाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी महापालिकेचे कर्मचारी ‘ऑन ड्युटी’ जुगार खेळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महात्मा गांधी मार्केटमधील पार्किंगच्या जागेतील एका खोलीत रोज जुगाराचा खेळ सुरू असतो. जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सतीश अंबर ठाकरे, नितीन भालेराव, संजीव हरी पाटील, नाना तुकाराम कोळी यांचा समावेश असल्याचे समजते.
अतिक्रमण निर्मूलन विभाग आधीच हप्ताखोरीच्या आरोपामुळे बदनाम झालेला असताना आता ‘ऑन ड्यूटी’ जुगारामुळे महापालिकेची प्रतिमा आणखीच म्हणून झाली आहे. महापालिकेतील असे अनेक कर्मचारी आहेत की, ते ड्युटी न करता पगार घेतात. गेल्या महासभेत नगरसेवक अनंत जोशी यांनी अशाच कामचुकार कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गेल्या महिन्यात प्रभाग अधिकाऱ्याचा रद्दीचा झोल उघड झाला. त्यात या अधिकाऱ्याचे निलंबन झाले.
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन ट्रॅक्टर भंगार परस्पर विक्री केल्याचा मुद्दा नगरसेवक चेतन सनकत यांनी मांडला होता. पुढे या प्रकरणाची चौकशी झाली नाही. सनकत यांनी पुरावा द्यावा, आम्ही कारवाई करू अशी भूमिका प्रशासनाने घेतली होती. तर सनकत यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासा, तेथेच पुरावा मिळेल असे आव्हान दिले होते. मात्र प्रशासनाने दुसऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज आपण कसे तपासणार म्हणून या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.
काही अतिक्रमणधारक व कर्मचारी यांच्या संगनमत असल्याचा आरोप सातत्याने होतो. जैन मंदिराच्या समोरील अतिक्रमणाबाबत तर ट्रस्टींनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्याकडे हप्तेखोरीची लेखी तक्रारच केली होती. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढत असून ते काम करण्याऐवजी कर्मचाऱ्यांकडून जुगार रंगविला जात आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जुगार अड्डाच चव्हाट्यावर आला. चार कर्मचारी टेबलावर बसून जुगार खेळत आहे तर एक कर्मचारी उभा आहे. या कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईच्या नावाने फुले मार्केट, गांधी मार्केट या भागात जाते. कारवाई नावालाच असते. महापालिकेतून हे कर्मचारी सकाळी कारवाईच्या नावाने बाहेर पडतात. मार्केटमध्ये सोयीने थोड फिरुन झाल्यावर गांधी मार्केटच्या पार्किंगमधील एका खोलीत जुगाराचा डाव भरविला जातो. डाव कोण जिंकला याचे रेकॉर्ड एका कागदावर, वहीवर ठेवले जाते. शेवटी हिशेब करून पैशाचे वितरण केले जाते, असे सूत्राने सांगितले.
व्हिडिओच्या आधारावर उपायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आजच सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. उपायुक्तांच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल. – डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महानगरपालिका