Amalner : त्या वेटरच्या खुनाचा प्रकार तीन महिन्यांनी उघडकीस, धक्कादायक माहिती आली समोर..

जुलै 22, 2023 4:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई व रुपाली हॉटेल आहे. तिथे दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून काम करत होता. तो सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होता. हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आला आहे.

crime 2 jpg webp

हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिलला अमळनेर पोलिस ठाण्यात खबर दिली की सकाळी सहाला हॉटेलकडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. सहा मे ला त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. चौधरी याने अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

मात्र सुरत येथील अहवाल दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनास्थळाजवळील फुटेज तपासले असता २२ रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता.

सीसीटीव्हीतून हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मृताचे नाव असून, नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५, रा. माळीवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला. त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस घनश्याम अशोक पवार याच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी (वय ३५, रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now