जळगाव लाईव्ह न्यूज । जवळपास दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात दोन दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली असून दुसरीकडे उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा वाढला आहे.

निरभ्र आकाशामुळे मागच्या २४ तासात जळगावचे कमाल तापमान ५ अंशांहुन अधिकने वाढून ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यातच हवेतील आर्द्रता ७६ टक्क्यांवर असल्याने उन्हाचा चटका आणि दमटपणा यामुळे जळगावकर अक्षरशः घामाघूम झाले आहेत. दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत असून, पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

सध्या जळगावचे वातावरण दमट आणि कोरडे असे दोन्ही स्वरूपाचे झाले आहे. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आणि हवेतील वाढलेली आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम जाणवत आहे. पावसाची प्रणाली पुढे सरकल्याने वाऱ्याचा वेगही मंदावला आहे. हवा स्थिर असल्याने जमिनीवरून सतत वर जाणारी पाण्याची वाफ वातावरणातच रेंगाळत राहत असून त्यामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ सप्टेंबरदरम्यान जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तसेच हवेतील आर्द्रता ७० ते ७५ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सध्या पावसापेक्षा दमट उकाड्याचा सामना जळगावकरांना करावा लागणार असून, आगामी काळात पावसाची पुन्हा हजेरी कधी लागते, याकडे नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.






