शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?

सप्टेंबर 16, 2026 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) सन २०२६-२७ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी दि. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

sinchan jpg webp

राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पूरक अनुदानाची तरतूद आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पूरक अनुदान देय असल्याने पात्र शेतकऱ्यांना मापदंडाच्या ९० टक्के मर्यादेत अनुदान देण्यात येते.

सन २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध आहे. सद्यस्थितीत महाडीबीटी पोर्टलवर या प्रवर्गातील लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त होण्याचे प्रमाण कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अर्ज करताना शेतकऱ्यांकडे मालकीचा ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक असणे आवश्यक आहे. तसेच फार्मर आयडी कार्ड काढलेले असणे आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असून त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादीबाबत स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. योजनेचा लाभ कमाल ५ हेक्टर क्षेत्रापर्यंत देण्यात येईल.

लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करावा. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत तपासणी करण्यात येऊन पात्र अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.
दरम्यान, या विशेष मोहिमेअंतर्गत कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी व उप कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी प्रत्येक गावात मेळावे आयोजित करून योजनेची माहिती देणार आहेत. शेतकऱ्यांनी अर्ज भरताना अचूक माहिती भरावी, जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही, असेही आवाहन करण्यात आले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच CSC केंद्राशी संपर्क साधावा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या विशेष मोहिमेत सहभागी होऊन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now