जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह संपूर्ण खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागाने उधना ते पुणे दरम्यान नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ट्रेन सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या नवीन रेल्वेमुळे जळगावसह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांचा पुणे प्रवास आता अधिक सुकर आणि जलद होणार आहे.

मंजूर करण्यात आलेली ही अमृत भारत एक्सप्रेस उधना येथून सुटून नंदुरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि हडपसर मार्गे पुण्यापर्यंत धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुण्याशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

उधना-पुणे अमृत भारत एक्सप्रेसचा सर्वाधिक महत्त्वाचा फायदा जळगाव, अमळनेर, नंदुरबार आणि चाळीसगावसह खान्देशातील प्रवाशांना होणार आहे. पुणे हे शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात.
नवीन रेल्वेमुळे जळगाव आणि खान्देशातून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे आणखी एक पर्यायी साधन उपलब्ध होईल. विशेषतः विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच पुणे परिसरात जाणाऱ्या नियमित प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
नंदुरबारमार्गे पुण्यासाठीची मागणी
सुरत आणि उधना येथून नंदुरबारमार्गे पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर उधना-पुणे अमृत भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्याने खान्देशातील प्रवाशांच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे.
दरम्यान, या गाडीची प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याची तारीख, वेळापत्रक, वार आणि थांबे याबाबतची अधिकृत माहिती रेल्वेकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे जळगावसह खान्देशातील प्रवाशांचे आता या नव्या रेल्वेसेवेकडे लक्ष लागले आहे.







