Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातून अंजुमन अहेले सुन्नत्वन जमातीच्या वतीने ईद-ए- मिलाद निमित्त पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहू अलौही वसल्लम यांच्या जन्मतिथीचे औचित्त्य साधून मुस्लिम समाज बांधवांनी रविवारी सकाळी 9.00 वाजेला ईद ए मिलाद सणानिमित्त भव्य जुलूस (मिरवणूक) शहरातील विविध भागातून काढण्यात आली.

मुस्लिम समाज बांधवातर्फे ईद ए मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील सर्व सुन्नी मशिदीचे पेशमाम (मौलांना) व मुस्लिम समाज बांधवांनी जाम मोहल्ल्यातील सुन्नी जामा मशीदीजवळ एकत्रीत होत नमाज पइण केले. खडका गावातील मुस्लिम कॉलनीतील पहारे मशीदचे मौलाना अब्दुल हकीम नईमी हे जुलूसचे अध्यक्षस्थानी होते तर जुलूसचे नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष शेख शफी पहेलवान यांनी सांभाळले.

जाम मोहल्ला परीसरातील अमरदीप चौकातून प्रार्थना करून जुलूसचा प्रारंभ झाला. शहरातील आगाखान वाडा, शिवाजी नगर, वरणगांव रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आमदार संजय सावकारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड व माजी नगरसेवक यांचा सत्कार जातीय सलोखा ठेवून अंजुमन अहेले सुन्नत्वन जमातीचे अध्यक्ष पदाधिकार्यांनी केला. जुलूस मार्गावर युवा मुस्लिम समाजातर्फे भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, चहा, खजूर, शरबत, पोहे असे स्टॉल उभारून त्याचे वाटप करण्यात आले तर रस्त्यावरील कचरा गैसिया नगर भागातील नवयुवक तरुणांनी उचलून शहरवासीयांना स्वच्छतेचा संदेशही दिला.
नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 3 मध्ये जुलूस पोहचून शाळेच्या मैदानात मुस्लिम समाज बांधव एकत्रित होऊन शहरातील सुन्नी मशिदीचे सर्व मैलांना मौलाना अब्दुल हकीम नईमी, मौलाना रेहान रज़ा, मौलाना सैय्यद शोएब, मुफ्ती नज़ीर, मुफ्ती वसी अहमद व आदी यांनी मुस्लिम समाज बांधवांना पैगंबर हजरत मुहम्मद सल्लल्लाहू अलौही वसल्लम यांच्या जीवन शैलीवर मार्गदर्शन केले व प्रार्थना करून जुलूसची सांगता करण्यात आली.










