जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत असून काल दि. १ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचा अवमान करणे बंद करावे, अशी माफक अपेक्षेने ५००० पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले. दरम्यान, याबाबात राज्यपालांनी आता एक परिपत्रक काडून आपली बाजू मांडली आहे व जनतेची क्षमा मागीतली आहे. यावेळी ते म्हणाले आहेत कि, महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
यावेळी राज्यपाल म्हणाले कि, दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.
सदर आंदोलन हे राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष रिकु चौधरी यांचा नेतृत्वाखाली करण्यात आले.या आंदोलनास अशोक भाऊ लाडवांजरी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष जळगाव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.आंदोलनावेळी सुनील माळी माजी नगरसेवक,राजू मोरे माजी नगरसेवक,सुशील शिंदे,अमोल कोल्हे,किरण राजपूत,दत्तात्रय सोनवणे,राजेंद्र बाऱ्हे,इब्राहिम तडवी,रफिक पटेल,कुंदन सूर्यवंशी,चंदन कोळी,सचिन साळुंखे,योगेश कदम,योगेश साळी,आकाश हिवरे,हितेश जावळे,किरण चव्हाण,अशोक सोनवणे,नईम खाटीक,राहुल टोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.