भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार- राजेंद्र लुंकड

एप्रिल 14, 2022 6:31 PM

Untitled design 2022 04 14T183023.663

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । जैन समाजाच्या परंपरेत जळगावची विशेष ओळख आहे, ज्या वेगाने प्रगतीकडे मार्गक्रमण सुरू आहे तीच गती कायम राहिल्यास येणाऱ्या पाच वर्षात जळगावचा सकल जैन समाज भारतात अग्रस्थानी असेल याचा मला दृढ विश्वास आहे’, असे बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी प्रतिपादन केले. शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त बालगंधर्व नाट्यगृहात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकल संघाचे अध्यक्ष दलीचंदजी जैन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर जयश्री महाजन, आ. राजुमामा भोळे, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, सुशील बाफना, अजय ललवाणी, स्वरूपचंदजी कोठारी, सौ. कमलादेवी कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, कस्तुरचंद बाफना, ललीत लोढाया, राजेश श्रावगी, माणकचंद बैद मान्यवर उपस्थित होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, ध्वजवंदन, माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन झाले.


शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे सकाळी वासूपूज्य मंदिरापासून शहरातील मान्यवरांनी झेंडा दाखविला व महावीर जयंतीच्या औचित्याने भव्य शोभा यात्रा सुरू झाली. या शोभा यात्रेत भगवान महावीर यांचे संदेश असलेले फलक, बेटी बचावो, बेटी पढाओ या सारखे सामाजिक संदेशाचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा, शहरातील स्त्री-पुरूष, युवावर्ग मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झालेला होता. ही शोभायात्रा सुभाष चौक मार्गे बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत पोहोचली. या शोभायात्रेचे धार्मिक सभेत रूपांतर झाले.


यावेळी प्रमुख पाहुणे, वक्ते राजेंद्र लुंकड यांनी सुसंवाद साधला. जळगावच्या वैभवात ज्यांनी भर घातली त्या स्व. भवरलालजी जैन, स्व. आर.सी. बाफना तसेच सुरेशदादा जैन यांचा आवर्जून उल्लेख केला. जैन समाजातील 16 हजारहून अधिक साधू- साध्वी आहेत, त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि संस्कार समाजाला मिळतात. परंतु बाह्य वातावरण दूषित झालेले आहे, अशा वातावरणात आपले स्वत्व टिकविणे आवश्यक आहे. आपले चरण हे मनुष्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात मात्र सत्य, अहिंसा, दया, क्षमा, हे पंचतत्व सिध्दांत मानवाला आत्मकल्याणापर्यंत घेऊन जातात. आचरणातुन समाजात परिवर्तन घडू शकते. आपले संस्कार हाच परिवार आणि धर्म मानत पुढे चालत राहिले पाहिजे. बाहेर असलेल्या दुषित वातावरणातही मुलांना संस्कारासह त्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now