जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) बाहेर साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन केंद्राभोवती मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आक्रमक झाली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास १७ सप्टेंबर रोजी शासकीय ITI बाहेर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपने दिला आहे.

शैक्षणिक संस्थेच्या अगदी बाहेरील परिसरात अशा प्रकारे कचरा साचून राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांना दररोज या अस्वच्छ वातावरणातून ये-जा करावी लागत असून, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगराच्या वतीने जळगावचे महापौर, महानगरपालिका आयुक्त तसेच अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासकीय आयटीआय बाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्याची तसेच भविष्यात येथे कचरा साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मात्र, प्रशासनाकडून अद्याप अपेक्षित स्वरूपाची ठोस कार्यवाही झालेली नसल्याने अभाविपने आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. १७ सप्टेंबर रोजी शासकीय आयटीआय बाहेर अभाविपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
अभाविपच्या प्रमुख मागण्या:
शासकीय ITI बाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटविण्यात यावे.
परिसरात साचलेला संपूर्ण कचरा तात्काळ उचलून स्वच्छता करण्यात यावी.
डास, माशे व इतर कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने फवारणी व कीटकनियंत्रण करण्यात यावे.
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात भविष्यात कचरा साचणार नाही, यासाठी कायमस्वरूपी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात यावी.
अभाविपचे प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे म्हणाले, “शासकीय आयटीआय व परिसरातील ६ महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थेच्या बाहेर अनेक दिवस कचरा साचून राहणे ही केवळ स्वच्छतेची समस्या नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब आहे. याबाबत जळगावचे महापौर, महानगरपालिका आयुक्त आणि अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासनाने तातडीने कचरा हटवून कायमस्वरूपी उपाययोजना करणे अपेक्षित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास ते आम्ही सहन करणार नाही. म्हणूनच १७ सप्टेंबर रोजी शासकीय आयटीआय बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.”
जळगांव महानगर मंत्री आर्यन भालशंकर म्हणाले,”शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष करेल.”











