दिव्यांग विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण; शासकीय सेवेत दाखल झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

ऑगस्ट 15, 2026 10:43 PM

दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबलचा स्वातंत्र्यदिन व यशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । स्वातंत्र्याचा उत्सव हा केवळ देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव नसून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वप्नांना पंख देण्याची संधी मिळण्याचा उत्सव आहे. या विचाराला केंद्रस्थानी ठेवत दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबल यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन व यशोत्सव सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

manobal

या सोहळ्याची सुरुवात अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षणाने झाली. कु. रेणुका केकण, Hearing Impaired विद्यार्थिनी आणि UPSC Civil Services मध्ये निवड झालेली मनोबल परिवारातील यशस्वी विद्यार्थिनी, हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिव्यांगत्वावर मात करत देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या रेणुकाच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाने स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला विशेष अर्थ प्राप्त झाला. “संधी मिळाली तर प्रत्येक व्यक्ती सक्षम होऊ शकते आणि मनोबल असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही,” हा संदेश तिच्या यशातून अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. शोभना भाटिया, National President, Association of MAHAISG; प्रसिद्ध ज्येष्ठ कार्डियाक ॲनेस्थेसिस्ट डॉ. अलका मांडके; माजी Additional Commissioner of State Excise मा. सुनील चव्हाण; UPSC Rank 948 रेणुका केकण; तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मंगलताई भिवंडीकर उपस्थित होते.

‘मनोबल’मधून उंच भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
दीपस्तंभ फाऊंडेशन – मनोबल ही संस्था २००८ पासून जळगाव, पुणे आणि दिल्ली येथे दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. निवासी शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उच्च शिक्षण, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे कार्य संस्थेकडून केले जात आहे.

संस्थेच्या या कार्यातून घडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आज MPSC, पोलीस सेवा, DMER, आरोग्य विभाग, महानगरपालिका, MAHATRANSCO, MAHAGENCO, महिला व बालविकास विभाग यांसह विविध शासकीय क्षेत्रांत प्रवेश मिळवत आपल्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये MPSC Clerk, पुणे पोलीस, Government Medical College/J.J. Hospital, आरोग्यसेवक, Lab Technician, DMER, Pharmacist, MAHATRANSCO, MAHAGENCO, महिला व बालविकास विभाग तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अशा विविध क्षेत्रांत कार्यरत होणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

अनाथ विद्यार्थी अनिल सानपचे भावनिक मनोगत

या सोहळ्यातील विशेष भावनिक क्षण म्हणजे अनाथ विद्यार्थी अनिल सानप याचे मनोगत होते. दीपस्तंभच्या माध्यमातून शिक्षणाची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून Pharmacist म्हणून शासकीय सेवेत प्रवेश मिळवलेल्या अनिलने आपल्या मनोगतातून संस्थेविषयी असलेले प्रेम, कृतज्ञता आणि आत्मीयता व्यक्त केली.

परिस्थितीने दिलेल्या मर्यादा ओलांडून दीपस्तंभने दिलेल्या आधारामुळे आपले आयुष्य बदलले, अशी भावना त्याने व्यक्त केली. दीपस्तंभ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांना कुटुंबाची ऊब, आत्मविश्वास आणि स्वप्नांना दिशा देणारे आपले घर आहे, अशा भावनेतून त्याने संस्थेविषयीचा ऋणानुबंध व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातही अनिल सानप यांचे मनोगत विशेषत्वाने नियोजित करण्यात आले होते.

क्रीडा क्षेत्रात ऋतुजा सोनोनेची आंतरराष्ट्रीय भरारी
दीपस्तंभची विद्यार्थिनी ऋतुजा रमेश सोनोने हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचा आणि देशाचा गौरव वाढविला. Heroes World International Championship 2026 मध्ये 49 किलो वजन गटात तिने कांस्यपदक पटकावले. थायलंडमधील बँकॉक-पट्टाया सिटी येथे झालेल्या या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची इंडोनेशियात होणाऱ्या World Championships साठी निवड झाली असून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला मिळाला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

JEE मध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या सई किरण देसलेचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रातही मनोबल परिवारातील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. JEE परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या सई किरण देसले हिचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणाच्या दिशेने झेप घेणाऱ्या सईचे यश मनोबल परिवारातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले.

देशभक्तीच्या सुरांनी रंगला सोहळा
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत वातावरण देशप्रेमाने भारून टाकले. ‘I Love My India’, ‘ओ देश मेरे’, ‘जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया’, ‘हे राष्ट्र देवतांचे’ यांसारख्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

‘दूरदृष्टीने केलेले काम पुढच्या अनेक पिढ्यांना दिशा देते’ – डॉ. शोभना भाटिया

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शोभना भाटिया यांनी एका प्रेरणादायी गोष्टीच्या माध्यमातून दूरदृष्टी म्हणजे काय आणि दूरदृष्टीने केलेल्या कामाचा समाजावर किती व्यापक परिणाम होतो, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दूरदृष्टी ठेवून उभे केलेले दीपस्तंभचे संस्थापक मा. यजुर्वेंद्र महाजन यांचे कार्य आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निर्माण झालेला सकारात्मक बदल याचा संदर्भ देत त्यांनी या कार्याचे कौतुक केले.

‘दीपस्तंभ ही ऊर्जेचा स्रोत आहे’ – मा. सुनील चव्हाण

मा. सुनील चव्हाण यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनला ‘ऊर्जेचा स्रोत’ असे संबोधत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. मास्तरांनी सुरू केलेला हा ज्ञानाचा यज्ञ असाच अखंड तेवत राहावा आणि त्याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना मिळावा, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अलका मांडके यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

या सोहळ्यात संस्थेच्या पालक आणि मार्गदर्शक डॉ. अलका मांडके यांचा विशेष कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशनसोबतचे आपले अनेक वर्षांचे आत्मीय नाते व्यक्त करताना डॉ. अलका मांडके भावुक झाल्या. संस्थेतील विद्यार्थ्यांशी निर्माण झालेली आत्मीयता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यावेळी विशेषत्वाने अधोरेखित झाले.

दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षण, संधी आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणाऱ्या दीपस्तंभच्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.

स्वातंत्र्याचा खरा अर्थ – सक्षम होण्याची संधी
ध्वजारोहणापासून ते यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारापर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या मनोगतांपासून मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांपर्यंत संपूर्ण सोहळ्याने ‘संधी, शिक्षण आणि मनोबल मिळाले तर परिस्थिती बदलता येते’ हा संदेश दिला.

एका बाजूला Hearing Impaired विद्यार्थिनी रेणुका केकण हिच्या हस्ते ध्वजारोहण आणि UPSC Civil Services मधील यश, दुसऱ्या बाजूला अनाथ विद्यार्थी अनिल सानपचे Pharmacist म्हणून शासकीय सेवेत पदार्पण, तर क्रीडा क्षेत्रात ऋतुजा सोनोनेची आंतरराष्ट्रीय भरारी आणि JEE मध्ये सई किरण देसलेचे यश—या सर्व यशोगाथांनी दीपस्तंभच्या कार्याची परिणामकारकता अधोरेखित केली.संधी मिळाली तर प्रत्येक व्यक्ती सक्षम होऊ शकते; आणि मनोबल असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही, हा संदेश देत व वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच आज सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाच्या Hepatitis B च्या चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये Association of MAHAISG यांचे मोलाचे योगदान लाभले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now