जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी या मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया विशेष ट्रेन
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण १८ फेऱ्या धावणार आहे. गाडी ०८६१० ही गाडी २२ एप्रिल ते १७ जूनपर्यंत दर बुधवारी सकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता हटिया येथे पोहोचेल. तर गाडी ०८६०९ ही परतीची गाडी २० एप्रिल ते १५ जून दरम्यान दर सोमवारी दुपारी ४.२० वाजता हटिया येथून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

या मार्गावर ही गाडी नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण २६ फेऱ्या होतील. गाडी ०१००१ ही गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता संतरागाछीला पोहोचेल. तर ०१००२ ही गाडी २३ एप्रिल ते १६ जुलै या काळात दर गुरुवारी दुपारी ३.५० वाजता संतरागाछीहुन सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ही गाडी विभागात नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल. यामुळे सुट्यांच्या काळात वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होईल.












