जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील जामनेर रोडवर एका रिक्षाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. वडापावच्या भट्टीजवळ रिक्षा चालू अवस्थेत ठेवल्याने गॅसच्या ज्वाळेमुळे ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील प्रसिद्ध ‘शेठ घासीलाल अँड सन्स’ या दुकानासमोर हा प्रकार घडला. एक रिक्षाचालक आपल्या रिक्षात ग्राहक घेऊन आला होता. ग्राहक वडा घेण्यासाठी दुकानात गेले असता, रिक्षाचालकाने आपली रिक्षा दुकानाबाहेरील वडापावच्या भट्टीजवळ सुरू (Start) अवस्थेत उभी केली होती.

भट्टीतील गॅसच्या ज्वाळा आणि रिक्षेचे इंजिन सुरू असल्याने अचानक आगीचा भडका उडाला. आगीने क्षणात संपूर्ण रिक्षेला वेढले. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून जामनेर रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
अग्निशमन दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच भुसावळ पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रिक्षाचा सांगाडाच शिल्लक राहिला असून चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.











