जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२६ । एकीकडे आखाती देशांमधील युद्धाचा थेट फटका भारतालाही बसत असून गॅस सिलिंडरसह इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. काही ठिकाणी इंधनाचे दरही वाढले आहे. मात्र अशातच सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

आज शुक्रवारी सकाळी, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या निर्णयानुसार पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटरवरून ३ रुपये प्रति लिटर करण्यात आले असून डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात इंधन दरवाढीची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
सरकारचा हा फायदा तेल कंपन्यांना होणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्या दबावाखाली होत्या. आता, तेल कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने उत्पादन शुल्क कमी केले आहे, ज्यामुळे त्यांना किरकोळ बाजारात तेलाच्या किमती वाढवण्यापासून रोखले जाईल.
या निर्णयामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक तसेच उद्योग क्षेत्राला होणार आहे. इंधन दर कमी झाल्यास महागाईवरही नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.











