जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्याचबरोबर आणखी 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. हे अतिरिक्त शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. यानंतर भारतीय वस्तूंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. या टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र टॅरिफच्या निर्णयानंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

जुलै महिन्यात भारताच्या बेरोजगारी दरात मोठी घट झाली आहे.सांख्यिकी मंत्रालयाच्या नियतकालिक कामगार दल सर्वेक्षण (पीएलएफएस) नुसार, देशातील बेरोजगारीचा दर जुलै २०२५ मध्ये ५.२% पर्यंत कमी झाला, जो जूनमध्ये ५.६% होता. ग्रामीण भागात हा दर कमी झाला तर शहरी भागात थोडीशी वाढ नोंदवली गेली. तरुणांमधील बेरोजगारी देखील कमी झाली.हा बेरोजगारी रेट कमी होण्यामागे शेतात सध्या सुरू असलेली कामं मानली जात आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना शेतात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.

जून महिन्यामध्ये भारतातील शहरी भागातील बेरोजगारी दर हा 7.1 टक्के एवढा होता, मात्र तो जुलै महिन्यात वाढून 7.2 टक्के एवढा झाला आहे. सरासरीचा विचार केल्यास भारतातील बेरोजगारीचा दर हा 5.6 टक्क्याहून कमी होऊन 5.2 वर पोहोचला आहे. ही भारतासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
भारताकडून नुकतीच जीएसटी रिफॉर्म करण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याचा देखील सकारात्मक परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. यामुळे आणखी काही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारीचा दर हा कमी होऊ शकतो. एकीकडे अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफमुळे चिंता व्यक्त केली जात होती, मात्र त्यातच आता ही दिलासादायक बातमी समोर आली आहे, येत्या काळात हा दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












