जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपाठोपाठ त्यांची सून खा.रक्षा खडसे या भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील दोन दिवसापूर्वी सुरु होत्या. परंतु या चर्चेवर रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे. जोपर्यंत मी स्वतःहून अधिकृत घोषणा करत नाही. तो पर्यंत माझ्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाच्या चर्चेला काहीही अर्थ नाही, असं खा. रक्षा खडसे म्हणाल्या.
मी भाजपची सदस्या असून रावेर लोकसभा मतदार संघात खासदार म्हणून काम करत अाहे. भविष्यात ही भाजपची सदस्या म्हणूनच काम करणार असल्याचे खासदार रक्षा खडसेही त्या म्हणाल्या. रक्षा खडसे यांनी गुरुवारी चोपडा तालुक्यातील नुकसानीची पाणी केली. यानंतर शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद सांधला त्यावेळी त्या बोलत होत्या.
खासदार रक्षा खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना २ रोजी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी आपण रक्षा खडसेंनाच विचारा, असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यानंतर गुरुवारी खासदार खडसे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत माझ्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाला अर्थ नाही, असे सांगून पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
मला राजकारणात येवून दहा वर्षे झाली. नाथाभाऊंनी खूप काही शिकवले. मला कुठेही अडचण आली तरी ते मदत करतात. नाथाभाऊंचे भाजपमध्ये असताना सर्वपक्षीय नेत्यांशी आपुलकीचे संबंध राहिले आहेत. आज देशात अनेक उदाहरणे आहेत की, एकाच घरात दोन ते तीन पक्षांचे प्रतिनिधी एकत्र राहतात. त्यामुळे आम्ही खडसे परिवार म्हणून एकत्र असलो तरी काम करताना अडचण येत नाही, असे खासदार रक्षा खडसेंनी स्पष्ट केले.
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, मला राजकारणात नाथाभाऊंनी आणले आहे. त्यांनी मला राजकारण शिकवले. त्यांनी सांगितले की, तुमच्या कामावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. त्यांच्या सांगण्यानुसारच मी काम करत आहे. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्याशी चर्चा केली होती. मला त्यांनी भाजपमध्येच काम करण्यासाठी सांगितले आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांनी जबरदस्ती केली नाही. आम्ही परिवार म्हणून एकत्र राहत असलो तरी जेव्हापासून दोघांचे पक्ष बदलले तेव्हापासून आम्ही दोघेही आपापला पक्ष वाढीसाठी काम करत असल्याचे चोपडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.