⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | महाराष्ट्र | अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव): अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’ सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय संमेलनाच्या प्रसिध्दीसाठी रिल्स, व्हिडीओ व सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापरण्यात येत आहे. 

९७ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे होत आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भुषविणार असून संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. 

साहित्य संमेलनाला यंदा ‘डिजिटल टच’ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी संमेलनाशी संबंधित प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅटबॉट’ वापरले जात आहे. संमेलनाशी निगडीत प्रश्नांची उत्तरे ‘व्हॉट्सॲप’वर मिळणार आहेत. त्यामुळे संमेलनात सहभागी होण्यापासून संमेलनस्थळी पोहचल्यानंतर सर्वांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार आहेत. ९७ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वांना यात जोडण्याचा प्रयत्न आहे. युवावर्गाला देखील संमेलनात सहभागी करुन घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी सांगितले.

चॅटबॉट कसे काम करणार

संमेलनाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ९५२९२१६३५५ हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. या क्रमांकवर नमस्कार, हाय किंवा हॅलो असा मेसेज केल्यानंतर तुम्हाला, ‘नमस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२३ च्या चॅटबॉटवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कृपया खालील पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा.’ असा मेसेज येईल. त्यात खाली दिलेल्या मेनूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साहित्य संमेलनाशी निगडित प्रश्नांची यादी दिसेल. त्यापैकी कोणताही प्रश्न निवडल्यास त्याचे उत्तर तात्काळ तुमच्या मोबाईलवर पाठविण्यात येईल. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, ‘चॅट बॉट’च्या माध्यमातून संमेलनाचे संकेतस्थळ, प्रतिनिधी व ग्रंथदालन नोंदणी, निवास व्यवस्था, भोजनाचा मेनू, तसेच चार दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती मिळणार आहे. याशिवाय संमेलनस्थळी कसे पोहचावे? संपर्क कुणाशी करावा? याची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. ज्यांना चॅटबॉटचा मोबाईल क्रमांक माहित नसेल त्यांना ‘लिंक’ किंवा व ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देखील ‘चॅट बॉट’चा वापर करता येणार आहे.

संमेलनाची जय्यत तयारी 

संमेलनाची जय्यत तयारी सुरु असून संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. वेगवेगळ्या सभागृहांची आखणी, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरु आहेत.

author avatar
Tushar Bhambare