⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव तालुक्यातील पाच जि.प.गटांसाठी भाजपचे ५ उमेदवार जाहीर ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपकडून जळगाव तालुक्यातील पाच जि.प.गटांसाठी आपल्या पाच नावांवर शिक्कामोर्तब केला असून, या उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली आहे. राज्यातील राजकारणामुळे शिवसेना संभ्रमात असताना, शिवसेनेची ताकद असलेल्या जळगाव तालुक्यातील पाच ही गटांमध्ये भाजपकडून आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

जळगाव तालुक्यात एकूण पाच जिल्हा परिषदेचे गट असून, यामध्ये कानळदा-भोकर गटात माजी पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांच्या पत्नी प्रियंका चौधरी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. ममुराबाद-आसोदा गटात भाजपकडून माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. लालचंद पाटील यांचा भादली गटात आरक्षण असल्याने लालचंद पाटील यांनी ममुराबाद-आसोदा या गटातून निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाकडून केला जात आहे. भादली गटात एसटी राखीव असल्याने भाजपकडून प्रभाकर सोनवणे हे इच्छुक आहेत. या गटात सोनवणे यांचे मुळ गाव मोहाडीचा देखील समावेश असल्याने सोनवणे भादली-कुसूंबा या गटातून इच्छुक आहेत. म्हसावद या गटातून भाजपाकडून ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिरसोली गटातून बाजार समितीचे माजी संचालक मनोहर पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर एकीकडे भाजपकडून जि.प.साठी तयारी सुरु असताना, दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या इच्छुकांची संभ्रमावस्था कायम आहे. तर राष्ट्रवादीने देखील आता गटनिहाय प्रमुख नेमले असून, जि.प.साठी तयारी सुरु केली आहे