जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। चाळीसगाव शहरातील गोपालपुरा व नागदरोड या भागात गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर दोन जण फरार झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुत्रांनुसार, चाळीसगाव शहरातील गोपालपुरा व नागदरोड भागात बेकायदेशीर गांजा विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस उपअधीक्षक अभयसिंह सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याची पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गोपालपुरा भागात छापा टाकला.
त्यात पोलिसांनी ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला. याप्रकरणी मांगीलाल मुरलीधर गुजर (वय ५४, रा. गोपालपुरा, चाळीसगाव) आणि नसीमबी अश्रमअली (५५) , रा. नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पिंटू पवार आणि साजन लंगड्या (दोन्ही रा.चाळीसगाव) हे दोघे पोलिसांना पाहून पसार झाले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी कारवाई तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच स.पो.नि. विशाल टकले, पो.उप.नि. सुहास आव्हाड, योगेश माळी, पो.ना.विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, दीपक पाटील, पंढरीनाथ पवार, पो.कॉ. विनोद खैरनार, सुनील निकम, संदीप पाटील, शरद पाटील, प्रवीण जाधव, मोहन सूर्यवंशी, महिला पो.कॉ. सबा फरहीन अ.हकीम शेख, चालक पो.कॉ. विजय महाजन (सर्व. नेम चाळीसगाव शहर पो.स्टे.)
तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन मापाडी सागर पाटील, (रा. चाळीसगाव), पंच तुषार पाटील, अलताफ हमीद पिंजारी यांनी संयुक्त अभियान राबवून केली. तपास पी.एस.आय. योगेश माळी, पो.ना.विनोद भोई, पो.कॉ. प्रकाश पाटील करीत आहेत.