जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील उदळी येथील जय श्रीराम ग्रामीण बिगर शेत सहकारी पतसंस्थेतून शेत तारण ठेवून तब्बल 12 लाख 35 हजार 177 रुपयांचे कर्ज काढल्यानंतर खोट्या दाखल्यांसह लेटरपॅडद्वारे कर्ज निल झाल्याची महसूल दप्तरी नोंद करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीत आरोपी दिनकर किसन नेमाडे (उदळी खुर्द, ता.रावेर) यांनी उदळीच्या जय श्रीराम पतसंस्थेतून शेत (गट क्रमांक 85/ब) तारण ठेवत कर्ज काढले होते व शेत पतसंस्थेकडे तारण असताना आरोपींनी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्क्यांचा आधार घेत संस्थेचे कर्ज निल झाल्याचा बनावट दाखला तयार करीत पतसंस्थेची फसवणूक केली तसेच शेत विक्रीचा व्यवहार केल्याची बाब उघड झाली आहे.

या प्रकरणी आरोपी दिनकर किसन नेमाडे (उदळी खुर्द, ता.रावेर), नारायण दोधू कोळी (आंदलवाडी, ता.रावेर), उदळी खुर्दच्या तलाठी रेखा सखरू जेरवाल यांच्याविरोधात दीपक भास्कर राणे (55, उदळी खुर्द, ता.रावेर) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले करीत आहेत.











