⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

युक्रेनमध्ये आपले नातेवाईक, मित्र अडकले असल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. भारतातील आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी, नागरिक युक्रेनमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे. भारत सरकारतर्फे त्यांच्यासाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली असून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. रशियाने युक्रेनच्या काही शहरात हवाई हल्ले सुरू केले असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. युक्रेनमध्ये शिक्षण, नोकरीसाठी गेलेले हजारो विद्यार्थी, नागरिक यामुळे तिकडे अडकून पडले आहेत. भारतात त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त होत आहेत.

केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नवीदिल्लीची हेल्पलाईन जारी केली आहे. भारतातील आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्यास टोल फ्री क्रमांक 1800118797, लँडलाईन 011-23012113 किंवा 23014105 किंवा 23017905 यावर संपर्क साधावा. तसेच फॅक्स 011-23088124, ईमेल – situationroom@mea.gov.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगांव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव 0257- 2217193 किंवा 0257 – 2223180 अथवा ईमेल sey.jalgaon@gmail.com यावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.