⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपा अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास महापौरांकडे तक्रार करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । जळगाव शहरात मनपा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता नेहमी योग्य राखला जाईल याकडे मक्तेदारांनी लक्ष द्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच मनपातील कुणीही अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्यास तक्रार करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील कामाचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार प्राप्त झाल्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, कुंदन काळे, अभियंता योगेश वाणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाहणीत कामाचा दर्जा योग्य असल्याचे दिसून आले. काम चांगल्या प्रकारे करून घेत असल्याने महापौर व उपमहापौरांनी अभियंता योगेश वाणी व मक्तेदाराचे अभिनंदन केले. महापौरांनी सांगितले की, जळगाव शहरात काम करणाऱ्या मक्तेदारांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रत्येक कामाचा दर्जा उत्तम राहील असेच काम करावे. कामात हलगर्जीपणा केल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापौरांनी दिल्या.

कोणत्याही मक्तेदाराला मनपा अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली किंवा कुणीही काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन देखील महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले आहे.