जळगावात नवा ट्विस्ट! गिरीश महाजनांच्या दाव्यानंतर बंडखोर रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’; महायुतीच्या गोटात खळबळ

जून 12, 2026 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोकुळ गीते यांनी अखेर नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यांनतर जळगावचाही पेच सुटला असून आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असा दावा भाजप नेते आणि संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, या दाव्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना (शिंदे गट) च्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

reshmakale 1

मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा काळे या आज सकाळपासूनच पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या संपर्कात नाहीत. जळगाव येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सध्या संपूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत असून त्या घरी उपस्थित नाहीत, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांचे सर्व मोबाईल फोनही सध्या ‘स्विच ऑफ’ येत आहेत.

महाजनांचा दावा आणि पुढील पेच
नाशिकमधील महायुतीतील बंडखोरीचा तिढा यशस्वीपणे सोडवल्यानंतर जळगावचाही प्रश्न सुटला असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यावर घोषणा करतील आणि रेश्मा काळे आपली उमेदवारी मागे घेतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यातच काळे अचानक गायब झाल्यामुळे जळगावमधील बंडखोरीचा पेच सुटण्याऐवजी अधिकच चिघळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

दरम्यान, रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच आपली भूमिका आक्रमक ठेवली होती. नाशिकमधील गुंतागुंतीमुळे आपल्याला जळगावातून उमेदवारी अर्ज भरावा लागला. जर नाशिकच्या बंडखोरांनी माघार घेतली, तर आपणही विचार करू, असे संकेत त्यांनी सुरुवातीला दिले होते. मात्र, काल माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट यू-टर्न घेतला. आपल्याला मतदारसंघातून आणि विशेषतः महिला लोकप्रतिनिधींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की मी उमेदवारी मागे घेऊ नये. त्यांच्या भावनांचा आदर ठेवून आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेऊ,” असे त्यांनी म्हटले होते. तसेच, आपण शेवटपर्यंत ही लढाई लढण्यावर ठाम असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

यातच आता रेश्मा काळे यांच्या या ‘नॉट रिचेबल’ भूमिकेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी महायुतीचे नेते रेश्मा काळे यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी होतात की जळगावात बंडखोरीचे हे मोठे आव्हान महायुतीला पेलावे लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now