जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२६ । जळगाव-बांभोरी रस्त्यावरील मानराज पार्क जवळ आज दि ११ जून रोजी अपघात झाला असून चालकाने कारचा अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारी भरधाव रिक्षा कारवर जाऊन आदळली. या जोरदार धडकेत रिक्षाचालकासह पाळधी येथील एक महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमींना तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या दिशेने कार क्रमांक (MH 12 TY 1762) जात होती. मानराज पार्क जवळ पोहोचताच कार चालकाने अचानक रस्त्यातच जोरात ब्रेक दाबला. कार जागेवरच थांबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव रिक्षा क्रमांक (MH 19 CW 6877) च्या चालकाला नियंत्रण ठेवता आले नाही आणि ही रिक्षा थेट कारच्या मागच्या भागावर जाऊन जोरात धडकली.

हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात रिक्षाचालक आणि रिक्षात बसलेल्या पाळधी येथील महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात हलवले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांत अद्याप नोंद नाही
या अपघाताच्या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान, या अपघातासंदर्भात अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.










