जळगावात बंडखोरीचे संकट टळले? महायुतीच्या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजनांची मोठी माहिती

जून 12, 2026 3:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२६ । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे गट) च्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या उमेदवारी माघारीबाबत महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, नाशिकपाठोपाठ आता जळगावचाही पेच सुटल्याची महत्त्वाची माहिती भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा उद्या (शनिवारी) जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील करणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

girish mahajan reshma kale

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “रेश्मा काळे यांच्या माघारीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे सविस्तर बोलणे झाले आहे. आता यामध्ये कोणतीही अडचण उरलेली नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज मुंबईत असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांच्याशीही फोनवरून सविस्तर चर्चा झाली आहे.”

उद्या गुलाबराव पाटील जळगावात दाखल होतील आणि रेश्मा काळे यांच्याशी थेट चर्चा करून अधिकृत घोषणा करतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही माध्यमांना सकारात्मक संकेत दिले. ते म्हणाले, “महायुतीची बैठक अत्यंत सकारात्मक झाली आहे. आमचे नेते गुलाबराव पाटील आज मुंबईत असल्याने आजच निर्णय जाहीर करता आला नाही. त्यामुळे तूर्तास तांत्रिकदृष्ट्या तिढा दिसत असला, तरी काळजी करण्याचे कारण नाही. उद्या गुलाबराव पाटील जळगावात रेश्मा काळे यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतील आणि अंतिम निर्णय जाहीर करतील.”

आज सकाळपासूनच बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्यामुळे महायुतीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली होती आणि त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या थेट मध्यस्थीनंतर महायुतीला जळगावमधील बंडखोरी रोखण्यात मोठे यश आले आहे.

भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोरील अडचण आता दूर झाली असून, उद्या होणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या अधिकृत घोषणेनंतर जळगावच्या या हाय-व्होल्टेज राजकीय नाट्यावर कायदेशीररीत्या पडदा पडणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories