गुन्हेयावल

देशी कट्टा घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । कंबरेला देशी कट्टा खोचून दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखा आणि यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून अटक केली. पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यावल-चोपडा महामार्गावरील किनगाव शिवारातील हॉटेल ‘श्री’समोर ही कारवाई करण्यात आली.

आगामी सण-उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे पथक यावल परिसरात गस्त घालत होते.

याचदरम्यान पवन सोनवणे हा बेकायदेशीर देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री होताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी किनगाव परिसरात सापळा रचला.

हॉटेल ‘श्री’समोर संशयित पवन सोनवणे पोलिसांच्या हाती लागला. त्याची झडती घेतली असता कंबरेला खोचलेला लोखंडी देशी बनावटीचा कट्टा आढळून आला. तसेच पॅन्टच्या खिशातून दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी शस्त्र आणि काडतुसे जप्त करून त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पवन सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान, आरोपीकडे हे बेकायदेशीर हत्यार नेमके कुठून आले आणि त्याने ते कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणत्या उद्देशाने बाळगले होते, याचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button