जळगाव जिल्हाहवामान

जळगावमध्ये हुडहुडी वाढली! यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद, पुढील दोन दिवस..

जळगाव लाईव्ह न्यूज । थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांना आता हुडहुडी भरायला लागली आहे. शहरातील तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. १८ नोव्हेंबर रोजी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, येत्या दोन दिवसांत पारा आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका वाढणार आहे. नेमका कसा असेल पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज? पाहूया…

हवामानाच्या अंदाजानुसार, १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात आकाश निरभ्र राहून वातावरण कोरडे असेल. विशेषतः १९ आणि २० नोव्हेंबर रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, रात्रीचा पारा १० ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागणार आहे.

दिवसा उन्हाचा चटका, रात्री थंडीचा जोर

जळगावमध्ये सध्या दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. मंगळवारी शहरात कमाल तापमान ३४.६ अंश, तर किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बुधवारी कमाल तापमान ३३ अंश आणि किमान तापमान १२.७ अंश सेल्सिअस होते. आगामी दिवसांत कमाल तापमान २९ ते ३१ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका जाणवेल, तर रात्री आणि पहाटे थंडीचा जोर कायम राहील.

ढगाळ वातावरणाचे संकट टळले

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र जमिनीवर धडकल्यानंतर त्याचा वेग बऱ्यापैकी मंदावणार आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरनंतर जळगावमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची जी शक्यता वर्तवली जात होती, ती आता टळली आहे. आगामी आठवड्यातही जळगाव शहर आणि जिल्ह्याचे हवामान कोरडेच राहील, ज्यामुळे रात्रीचा पारा स्थिर राहून थंडीचा मुक्काम कायम राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button