जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यातील वाकी शिवारामध्ये विहिरीतील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याने विजेचा जोरदार झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली. जितेंद्र प्रल्हाद पाटील (वय ३०) असे मृत तरूणाचे नाव असून या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जितेंद्र पाटील हा तरूण कुटुंबियांसह वाकी गावात वास्तव्यास होता. शेतीचे काम करत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच त्याच्यावर मृत्यूने झडप घातली असून या घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.

जितेंद्र पाटील हा शेतात गेला होता. पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीत असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेला. इलेक्ट्रीक खांबवर असलेली लोखंडी पेटी उघडत असतांना त्याला अचानक विजेचा धक्का लागला. यामुळे तो फेकला गेला. हि घटना आजूबाजूचा शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत त्याला तातडीने बोदवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषीत केले. जितेंद्रच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळताच परिसराने एकच आक्रोश केला. तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











