
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कृषी पंप, तांब्याची वायर, एमएसईबी वायर, केबल तसेच सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर दि. २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी चोरीच्या घटनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा व्यापक परिणाम साधण्यासाठी शेजारील जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील पोलिस यंत्रणेशीही समन्वय साधण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतांमध्ये कृषी पंप, तांब्याच्या वायर, एमएसईबी वायर आणि सोलर पॅनेल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्यांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक ग्रामीण, जालना तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, बुऱ्हाणपूर आणि बडवानी जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक प्रतिबंधात्मक आणि तपासात्मक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
चोरीचे हॉटस्पॉट निश्चित करणार
विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस स्टेशननिहाय चोरीच्या घटनांचा हॉटस्पॉट मॅप तयार करण्यात येत आहे. चोरीची वेळ, गुन्ह्याची पद्धत, वापरलेले वाहन, तांब्याची वायर किंवा केबलचा प्रकार व प्रमाण, चोरीचा मार्ग तसेच इतर बाबींचे विश्लेषण केले जात आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या संबंधित गुन्ह्यांच्या एफआयआरचे तुलनात्मक विश्लेषण करून चोरीच्या पद्धतीतील समान बाबी शोधल्या जात आहेत.
भंगार व्यावसायिकांवर लक्ष
चोरीच्या मालाची विल्हेवाट कुठे लावली जाते, याचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख भंगार व्यावसायिकांची यादी तयार करून तपासणी आणि चौकशी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात तांब्याची खरेदी-विक्री, संशयास्पद व्यवहार आणि चोरीच्या मालाच्या संभाव्य विल्हेवाटीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. तसेच भंगार बाजारपेठ आणि संवेदनशील भागात गोपनीय माहितीचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येणार आहे.
सराईत आरोपींचा स्वतंत्र डेटाबेस
वायर, मोटार आणि सोलर पॅनेल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपींचा स्वतंत्र डेटाबेस तयार केला जात आहे. त्यांच्या सध्याच्या वास्तव्याची माहिती, हालचाली, साथीदार आणि पूर्वीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घरझडती आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण
संवेदनशील भागातील सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पुरावे आणि आवश्यकतेनुसार तांत्रिक डेटाचे विश्लेषण करून संशयित वाहने, व्यक्ती आणि त्यांच्या हालचालींची माहिती संकलित केली जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी शक्य असेल तेथे सोलरवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
सोलर प्रकल्पांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष
जिल्ह्यातील सोलर कंपन्या आणि प्रकल्प व्यवस्थापनासोबत बैठका घेऊन सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था तसेच रात्रीच्या वेळी सर्च लाईट असलेल्या सुरक्षा वाहनांची गस्त ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
गावपातळीवरही गस्त वाढविणार
पोलीस पाटलांचे विशेष प्रबोधन करून गावातील संशयित हालचाली आणि व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. संवेदनशील गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल अधिक सक्रिय करण्यात येणार असून, विशेष मेळावे घेऊन रात्रीची गस्त, संशयित हालचालींची नोंद आणि पोलिसांशी त्वरित संपर्क याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. आवश्यकतेनुसार त्यांना टॉर्च व इतर मूलभूत साधने उपलब्ध करून देण्यात येतील.
तसेच विहिरी, तलाव, कालवे, नदीकाठ आणि अन्य पाणी स्रोतांच्या परिसरातील शेतांमध्ये रात्रीची गस्त वाढविण्यात येत आहे. अशा संवेदनशील ठिकाणी नियमित तसेच अनपेक्षित पेट्रोलिंग करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. जिल्ह्यातील कृषी पंप, वायर आणि सोलर पॅनेल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही शेत परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





