बोदवड–मुक्ताईनगरमध्ये थेट बांधावर जाऊन पीकस्थितीची पाहणी; अधिकाऱ्यांना वास्तवदर्शी अहवालाचे निर्देश

जळगाव लाईव्ह न्यूज । “पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात अपेक्षित उत्पादन येणार नाही, ही वस्तुस्थिती आम्ही प्रत्यक्ष बांधावर पाहत आहोत. या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. पालकमंत्री म्हणून मी आणि शासन शेतकरी व शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाच्या निकषांनुसार मदतीस पात्र असलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देणार नाही,” अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यातील पीकस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका, कापूस आणि सोयाबीन पिकांची पाहणी केली. पिकांच्या स्थितीची पाहणी करतानाच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाचा खंड, उत्पादनात होणारी घट आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृहात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद करताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थितीवर आधारित माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठवावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने करावी, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक येथील विभागीय बैठकीत जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांची पीकस्थिती कृषिमंत्र्यांसमोर मांडून, दीर्घ पावसाच्या खंडामुळे घटलेल्या उत्पादनाचा विचार करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
पाणीटंचाईची वाट पाहू नका; आतापासून नियोजन करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संभाव्य पाणीटंचाईची पूर्वतयारी आतापासूनच करण्याचे निर्देश दिले. गावनिहाय जलस्रोतांचा आढावा घेऊन टंचाईग्रस्त भागांचा आराखडा तयार करावा, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनाने वेळेत नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले
वीज, पाणी आणि पशुधनाच्या प्रश्नांवर एकत्रित काम करा
महावितरण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी आणि महसूल विभागांनी आपापल्या विभागापुरते मर्यादित न राहता समन्वयाने काम करावे. कृषिपंपांचा वीजपुरवठा, बंद रोहित्रे, पाणीपुरवठा योजना तसेच पशुधनासाठी आवश्यक पाणी याबाबत शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “संकट मोठे असले तरी तुम्ही एकटे नाही. तुमची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचविणे आणि जास्तीत जास्त दिलासा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे ही आमची जबाबदारी आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्याच्या पिकाबरोबरच त्याच्या पशुधनाची काळजी घेणेही आपली जबाबदारी आहे. पुढील काळात कोणत्याही भागात गंभीर चारा टंचाई निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने पशुसंवर्धन विभागाने आतापासून नियोजन करावे. बांधावरचे वास्तवच अहवालात दिसले पाहिजे’ बोदवड परिसरातील पाहणीदरम्यान पावसाच्या दीर्घ खंडाचा पिकांवर झालेला परिणाम पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहिला. विद्युत मोटारी, केबल आणि वीजतार चोरीच्या घटनांबाबतही पोलीस व महावितरण विभागाने संयुक्त कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादनातील घट आणि आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही पावसाच्या खंडामुळे मतदारसंघातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगत शेतकऱ्यांची वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भरीव मदत देण्याची मागणी करत एकरी लाख रुपयांच्या मदतीचा आग्रह केला. शेतकऱ्यांना दिलासा मिळेपर्यंत ही मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरू. पालकमंत्रीही या प्रश्नासाठी शासनदरबारी ठामपणे पाठपुरावा करतील,’’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
बैठकीच्या प्रारंभी मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी पीकस्थिती तसेच संबंधित विषयांचे सविस्तर सादरीकरण केले.







