जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नात्यातीलच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी पाशवी अत्याचार केल्याप्रकरणी ४३ वर्षीय नराधमाला धरणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मंगळ गणसाराम महाले (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळ महाले याने पीडित १६ वर्षीय बालिका अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आरोपीने तिला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली. या धाकाने आरोपीने खपाट गावाजवळील झेरी नाल्याकाठच्या झाडाझुडपांत नेऊन तिच्यावर बळजबरीने अनेकदा लैंगिक अत्याचार केला.
या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या गंभीर प्रकारानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली. यानंतर पोलिसांनी मंगळ महाले याला जेरबंद केले.
याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६१(१), ३५१(३) आणि पोक्सो (POCSO) कायदा कलम ४ व ६ अन्वये गुन्हा (गु.रं.नं. ३२७/२०२६) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.











