
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा एमआयडीसी पोलिसांनी तपास लावत एका आंतरराज्यीय चोराला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची स्प्लेंडर प्लस दुचाकी हस्तगत केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जळगाव शहरातील शेरा चौक, रझा कॉलनी, मेहरुण परिसरातील रहिवासी रमजान खान बाबू खान यांनी त्यांची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच-१९ डीवाय-४८७४) १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता अजिंठा चौफुली येथील ईदगाह कॉम्प्लेक्ससमोर पार्क केली होती. वैयक्तिक काम आटोपून ते परत आले असता पार्किंग केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही.
यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान चोरी करणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांच्या हाती लागली.यानंतर पथकाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी संशयित आरोपीस ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव तुलसीराम काल्यासिंग कास्दे (वय २८, रा. ८३ झाकस, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्य प्रदेश. ह.मु. प्लॉट नं. ३४, गट नं. १६७/१, सुप्रिम कॉलनी, शारदा कॉलनी, शारदा शाळा शेजारी, जळगाव) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पूर्णपणे हस्तगत करण्यात आली आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.



