
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसणार आहे. जळगाव जिल्हा दूध संघाने दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ जाहीर केली असून, आज म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून नवे दर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे, वर्षभरात दुधाच्या दरात तब्बल चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.
नव्या दरानुसार विकास गोल्ड दूध आता ८२ रुपये प्रतिलिटर, तर प्रमाणित दूध ७४ रुपये आणि गायीचे दूध ६४ रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे.
दुष्काळी परिस्थितीचा थेट परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घटल्याने दूध संघाकडे होणारी दुधाची आवक सुमारे ४० टक्क्यांनी कमी झाली आहे.दूध खरेदीचे वाढलेले दर, पॅकिंगसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती, डिझेलचे वाढलेले दर तसेच वाहतूक आणि पॅकिंग खर्चात झालेली वाढ यामुळे दूध विक्रीचा खर्च वाढला आहे. हा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी विक्री दरात वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.
वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ
जिल्हा दूध संघाने यावर्षी यापूर्वी २७ फेब्रुवारी, १२ ऑगस्ट आणि ११ ऑक्टोबर रोजी प्रत्येकी २ रुपयांची दरवाढ केली होती. आता २७ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरातील ही चौथी दरवाढ ठरली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांना फटका
दूध उत्पादनात घट झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वाढलेले दर काही प्रमाणात दिलासा देणारे ठरत आहेत. मात्र दुसरीकडे दूध महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती बजेटवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
दरम्यान, दुधाच्या दरवाढीमुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर चहाच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता दूध विक्रेते आणि चहावाले दरवाढीबाबत काय निर्णय घेतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.





