⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

फाईल कुणाकडे, किती दिवस होती; क्यूआर कोडद्वारे मिळणार इत्यंभूत माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेत क्यूआर कोडद्वारे फाईलची ट्रॅकिंग करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे फाईल कोणत्या अधिकाऱ्याकडे व किती दिवस होती यासह फाईलची इत्यंभूत माहिती प्रशासनाला मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे फाईल दाबून ठेवण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे.

एकाच टेबलवर अनेक दिवस पडून राहणाऱ्या फाईलमुळे कामाचा खोळंबा होत असतो. अधिकाऱ्यांकडे पडून राहणाऱ्या या फायलींचा तातडीने निपटारा होऊन कामे जलदगतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेतील फाईल्स क्यूआर कोडद्वारे ट्रॅकिंग करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणती फाईल कोणाकडे किती दिवस पडून होती, त्यांनी काय केले, केव्हा फाईल पुढे पाठविली याची सर्व माहिती प्रशासनाला मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वीही जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकर ही सिस्टीम होती. मात्र, त्यात काही महत्वाचे बदल करून क्यूआर कोड लावण्याच्या सूचना सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या असून फाईल आल्यानंतर त्या फाईलवर वेबसाइटवरून लॉग-इन करून क्यूआर कोड प्रिंट करून लावला जाणार आहे. क्यूआर कोड लावल्यानंतरच प्रत्येक फाईल सबमिट होणार आहे. दरम्यान, मोबाईलवरून कोड स्कॅन करूनही फाइलबाबत माहिती मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण
सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी सुरुवातीपासूनच ‘नो फाईल्स पेंडिंग’ वर भर दिला आहे. पीआरसी समितीच्या दौऱ्यानंतर त्यांनी याबाबतचे धोरण अधिकच कडक केले आहे. फाईल तातडीने मार्गी लावण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, या नवीन प्रणालीचे प्रशिक्षण ५ ऑक्टोबरला सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही ही यंत्रणा अद्ययावत करण्यात आली असून कनिष्ठ सहाय्यक प्रशांत होले व संगणक ऑपरेटर राजेश चव्हाण हे याची हाताळणी करीत आहेत.