⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

नियमांचं उल्लंघन : आमदार, खासदारांसह सात हजार जणांवर गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सोशल डिस्टन्स न पाळणे व मासक न लावण्या प्रकरणी खासदार, आमदार इतर लोकप्रतिनिधींसह तब्बल सहा ते सात हजार जनसमुदायावर दोन वेगवेगळ्या घटनेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत चाळीसगाव पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिलाखेड ते शहरातील सिग्नल चौकपर्यंत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आगमन व स्वागतानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सोशल डिस्टनचे पालन न करणे, मास्क न लावणे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक भटू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासदार उमेश पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, घृषणेश्वर पाटील, पंचायत समिती सदस्य संजय पाटील, शेखर देशमुख, भगवान पाटील, जगदीश चौधरी, श्याम देशमुख, नगरसेवक संजय पाटील, रामचंद्र जाधव, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, सदानंद चौधरी यांच्यासह चार ते पाच हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आद्य क्रांतिकारक तंट्या तात्या (नाईक) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महाविद्यालय मैदानात जमुन सोशल डिस्टन्सचे पालन न करणे व तोंडाला मास्क न लावणे, या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवराम गायकवाड, सुधाकर वाघ, मोतीलाल पवार, पवन राजे सोनवणे, रविंद्र सोनवणे, पिंटू सोनवणे, सुरेश सोनवणे, प्रवीण मालचे, दशरथ मोरे, गणेश वाघ यांच्यासह जवळपास अठराशे ते दोन हजार जनसमुदायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहे.