⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । विविध आजारांवर पशुंवर उपचार करणाऱ्या, वेळीच लसीकरण करुन पशुंचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे कार्य जबाबदारीने पार पाडुन फावल्या वेळात वृक्षसंवर्धनाचे अनमोल कार्यही पार पाडता येते. याचा प्रत्यय रुईखेडावासिंना आला. मुक्ताईनगरला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी दाभाडे यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा येथील पशु दवाखान्याच्या आवारात वृक्षारोपण करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे.

यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉ.जवरे, खर्चे, युवराज पाटील, भालेराव, तसेच रुईखेडा येथील पशुपालक व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल परीसरातुन कौतुक होत आहे. डॉ अश्विनी दाभाडे यांचे मुळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील वडशिंगी आहे. वैद्यकीय शिक्षण पुर्ण करुन एमपीएससी मधुन फेब्रुवारी २०२२ मध्ये मुक्ताईनगर येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणुन त्या रुजु झाल्या. पेशाने वैद्यकिय क्षेत्रात जरी असल्या तरी त्यांना लहानपणापासूनच निसर्गाविषयी आवड आहे. दरवर्षी शक्य होईल तिथे त्या मोठ्या आवडीने वृक्षारोपण करतात तसेच लावलेली झाडे खरोखर जगली पाहीजेत. यासाठी त्या आठवणीने वेळोवेळी लक्ष देतात. आतापर्यत त्यानी दोनशेच्यावर विविध प्रकारची ठिकठिकाणी झाडे लावुन जगवली आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या छंदाचे अनेकांनी कौतुक केले व अनेकांनी बोध घेऊन हा वारसा जोपसला असल्याचे समजते.वृक्षलागवड व त्यांच संवर्धन करणे काळाची गरज आहे.

आपण निसर्गाचे काही तरी देणे लागतो, झाडे लावुन त्यांचं संगोपन करणे हि आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुळातच झाडं लावणे व जगविण्याची आवड असणाऱ्या डॉ अश्विनी दाभाळे यांचा वाढदिवस ९ जुलै रोजी असतो ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला वाढदिवस असल्याने तसेच निसर्गाची आवड असल्याने वाढदिवसाचं औचित्य साधुन झाडं लागवडीची कल्पना त्यांना सुमारे आठवर्षापुर्वी सुचली. आणि त्यानी हि कल्पना नुसती कल्पना न ठेवता प्रत्यक्षात कृतीत आणली. प्रत्येकानेच वृक्षरोपण करुन झाडं जगविले पाहीजे. औद्योगीकरणामुळे पर्यारणाचा ढासळत चाललेला समतोलपणा टिकवुन ठेवण्यास वृक्षसंवर्धन करणे गरजेचं आहे. असं वैयक्तीक मत त्यांनी ‘जळगाव लाईव्ह’ च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केलं. त्यांच्या या ‘वनसंवर्धन’ कार्याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ डुघ्रेकर यांनी कौतुक केले आहे.अतिरीक्त पदभाराची जबाबदारी सांभाळुन वृक्षरोपणाचा छंद जोपासने हे कौतुकास्पद आहे.