भुसावळ

वलसाड-दानापूर विशेष गाडीला पुन्हा मुदतवाढ ; खान्देशातील ‘या’ स्थानकांवर आहेत थांबा

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी सणासुदीत रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेनं अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली. यातच आता भुसावळमार्गे धावणाऱ्या वलसाड ते दानापूर विशेष रेल्वेच्या फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सणासुदीत गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला असून या विशेष रेल्वेला खान्देशातील ठराविक तीन प्रमुख स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबा देण्यात आला आहे. मात्र जळगावला या गाडीला थांबा देण्यात आला नाहीय.

रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०२५ वलसाड–दानापूर विशेष रेल्वे सोमवार, ५ ऑक्टोबरपासून २३ नोव्हेंबरपर्यंत वाढीव कालावधीत धावणार आहे. ही गाडी वलसाड येथून दर सोमवारी सकाळी ८.४० वाजता सुटते. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती दानापूर स्थानकावर पोहोचते.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०२६ दानापूर–वलसाड विशेष रेल्वेला ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर मंगळवारी दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता वलसाड येथे पोहोचते.

या स्थानकांवर आहेत थांबे?

या गाडीला भेस्तान, नंदुरबार, धरणगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी यांसह विविध स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांना गुजरात तसेच मध्य प्रदेश आणि बिहारकडे जाण्यासाठी या विशेष रेल्वेचा उपयोग होत असतो.

गाडी क्रमांक ०९०२५ वलसाड–दानापूर विशेष रेल्वेच्या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण शनिवारपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणालीच्या (पीआरएस) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करून आगाऊ आरक्षण करता येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button